ठाणे शहरात झालेल्या गृह मतदानास ८५ वर्षावरील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे,दि. १४ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी  लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची खबरदारी देखील प्रशासनाने घेतली आहे. 85 वर्षांवरील जे नागरिक व दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रापर्यत पोहचू शकत नाही अशांसाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या गृहमतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 105 मतदारांपैकी 96 मतदारांनी मतदानाचा आज गृहमतदान केले.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या  सहाय्यक निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदानासाठी विविध भागातील नागरिकांकडे जाण्यासाठी एकूण 11 पथके तयार करण्यात आली होती. एका पथकात मतदान अधिकाऱी, मदतनीस कर्मचारी, पोलीस कर्मचारी व शिपाई  व राजकीय उमेदवारांचे प्रतिनिधीं यांचा समावेश करण्यात आला होता. 11 पथके 148 विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी रवाना करण्यात आली असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांनी नमूद केले.

148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील 85 वर्षावरील एकूण 103 तर 2 दिव्यांग अशा एकूण 105 मतदारांनी  गृहमतदानासाठी  निवडणूक विभागाकडे अर्ज भरुन दिले होते. या सर्व मतदारांच्या घरी आज प्रशासनाच्या वतीने पथके पाठविण्यात आली होती. नागरिकांनीही गृहमतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा असा संदेश नागरिकांना दिला. नोंदणी केलेल्या 105  मतदारांपैकी एकूण 96 जणांनी गृहमतदानाचा अधिकार बजावला. तसेच निवडणूक आयोगाने गृहमतदानाची सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्व ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

०००