तंत्रज्ञान क्रांतीमुळे दिव्यांगांचे जीवन सुलभ होईल : राज्यपाल रमेश बैस

मुंबईः दि. 8 :  दिव्यांगांच्या जीवनात  तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सकारात्मक बदल होणार असून त्यांचे जीवन सुलभ होईल. दिव्यांगांकरिता कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले.

राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, शनिवारी (दि.8)  मालाड, मुंबई येथे 100 दृष्टिहीन विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित स्मार्ट चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अंदाजे वीस हजार रुपये किंमत असलेल्या स्मार्ट चष्म्यांमुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अभ्यास करणे, शाळेत अथवा अन्यत्र जाणे तसेच इतर दैनंदिन कामात मदत होणार आहे. या चष्म्यामध्ये लेन्स, प्रोसेसर व स्पीकरचा समावेश आहे.

जगाच्या लोकसंख्येपैकी दर आठ व्यक्तींमागे एक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे दिव्यांग असून भारताची दोन टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे. देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविणे गरजेचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

दिव्यांगांची सेवा हीच नारायणाची सेवा आहे. दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी मिळाली तर ते प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात, असे सांगून दिव्यांगांच्या सक्षमीकरणाबद्दल मानवाधिकार आयोग व हेतू चॅरिटेबल ट्रस्ट करीत असलेल्या कार्याबद्दल राज्यपालांनी उभय संस्थांचे कौतुक केले.

स्मार्ट चष्मे खरेदीसाठी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच इतर दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या संकेतस्थळाचे यावेळी अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात 75 दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश देखील प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. संदीप मेहता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. शिवकुमार डिगे व न्या.अभय आहुजा, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड (नि.) व हेतू चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखबचंद जैन उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उपनगर जिल्हा तसेच हेतू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

000

Maha Governor presents AI assisted Smart Glasses to Visually Impaired children

Maharashtra Governor Ramesh Bais presented the AI assisted Smart Glasses to 100 visually impaired children at a programme held at Malad, Mumbai on Saturday (8 Jun).

The programme was organised by the Maharashtra State Human Rights Commission in association with the District Legal Service Authority – Mumbai Suburban District and the Hetu Charitable Trust.

The Governor felicitated the Minister for Skill Development Mangal Prabhat Lodha and other donors for supporting the purchase of AI assisted Smart Glasses for the visually impaired persons. The website of Hetu Charitable Trust was also launched on the occasion.

Supreme Court Judge Justice Sandeep Mehta, Bombay High Court judges Justice Shivkumar Dighe and Justice Abhay Ahuja, Chairman of Maharashtra State Human Rights Commission Justice (Retd) K.K. Tated and Secretary of Hetu Charitable Trust Rikhabchand Jain were prominent among those present.

000