तिरू नदीवरील बॅरेजसमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी – उपमुख्यमंत्री अजित पवार

सुमारे २.२४ दलघमी पाणीसाठा झाला निर्माण; ४९६ हेक्टरला लाभ

लातूर, दि. ०१ : तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या ७ बॅरेजसमधील पाण्यामुळे डोंगरी व अवर्षण प्रवण जळकोट तालुक्यातील शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होवून त्यांच्या जीवनात समृद्धी येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. तिरू नदीवरील बॅरेजसचे लोकार्पण आणि जलपूजनानिमित्त डोंगरगाव बॅरेज येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता आय. एम. चिश्ती, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे, निम्न तेरणा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम. महाजन, उपविभागीय अधिकारी बी. डी. रावळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, परिसरातील शेतकरी, नागरिक यावेळी उपस्थित होते.

  

तिरू नदीवरील ७ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रुपांतरण बॅरेजसमध्ये करून या नदीवर बॅरेजसची शृंखला तयार करण्यात आली आहे. यासाठी जवळपास १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. येथील शेतकऱ्यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न यामुळे पूर्णत्वास आले आहे. या बॅरेजसमुळे नदीपात्रात सुमारे २ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. या माध्यमातून निर्माण झालेल्या सिंचन सुविधेमुळे शेतीमध्ये चांगले पीक निघून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले. तसेच शेतमालाला योग्य दर देण्यासाठी राज्य शासन विविध पावले उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले.

उदगीर व जळकोट तालुक्यातील विकास कामांसाठी राज्य शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारती, रस्ते यासह विविध कामे गतीने पूर्ण झाली आहेत. या भागातील उर्वरीत कामांसाठीही भविष्यात आणखी निधी देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे अडीच हजार कोटी रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सप्टेंबर महिन्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवीत असल्याचे ते म्हणाले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूर जिल्ह्यातील विविध प्रकल्प, तिरू नदीवरील बॅरेजसची माहिती देणाऱ्या नकाशाची पाहणी केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कोनशीला अनावरण व डोंगरगाव बॅरेजमधील पाण्याचे जलपूजन करण्यात आले.

सुमारे ४९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा

तिरू नदीवर बेलसांगवी, बोरगाव, तिरुका, सुल्लाळी, गव्हाण याठिकाणी प्रत्येकी एक आणि डोंगरगाव येथील दोन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजसमध्ये रुपांतरण करण्यात आले आहे. जवळपास २.२४ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे सुमारे ४९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासोबतच भूजल पातळीत वाढ होत आहे. परिसरातील विहिरी, विंधन विहिरींच्या पातळीत वाढ झाल्याने शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे.

*****