ते मृत्यू उष्माघातामुळे नसल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे झाले स्पष्ट – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. राठोड

नागपूर,दि. 31 : जिल्ह्यात उष्णतेचा दाह वाढला असून यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 12 रुग्ण तर मनपा हद्दीच्या क्षेत्रात 12 रुग्ण महानगरातील विविध रुग्णालयात दाखल झाले होते. हे सर्व 24 रुग्ण यशस्वी उपचारानंतर बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. पोलीस विभागाने अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केलेल्या 12 व्यक्तींचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर हे मृत्यू उष्माघाताने झाले किंवा कसे याबाबत स्पष्टता येईल. एप्रिल महिन्यात अकस्मात जे तीन मृत्यू झाले होते त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यांचे मृत्यू उष्माघाताने नसून जंतूसंसर्ग व निमोनियाने झाले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.बी.राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

उष्माघात मृत्यू अन्वेषण समितीची बैठक आज जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी समितीतील सदस्य तथा मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, बालरोग तज्ज्ञ दिलीप मडावी, डॉ.मृणाल हरदास, फिरते पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गुज्जनवार, फोरेन्सिक मेडीसीनचे डॉ.दिनेश अकर्ते व इतर सदस्य उपस्थित होते.

जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे नोंद झालेल्या संशयित उष्माघात रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला idspnagpur2024@gmail.com या इमेलवर कळवावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यातील संशयित उष्माघात रुग्णांची माहिती दररोज शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे. त्यानुसार दिनांक 31 मे 2024 रोजी अखेरपर्यंत 24 संशयित रुग्णसंख्या नोंदविण्यात आलेली आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. कोणत्याही व्यक्तीचा ताप जर 104.7 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, त्याचे  भान हरपत असेल अथवा तीव्र डिहायड्रेशनची लक्षणे असतील तर त्या रुग्णाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आले आहे.

उष्माघाताच्या बचावासाठी पुरेसे पाणी, ताक किंवा लिंबु पाणी इत्यादी द्रव पदार्थ घ्यावयास हवेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये. बाहेर पडायचे असल्यास डोक्यावर टोपी, रुमाल,छत्री इत्यादी वापरावे. वातावरणाला पंखा, कुलर, एसीने थंड ठेवण्याचे प्रयत्न करावेत. लहान मुले, वयस्कर मंडळी यांची विशेष काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.

०००