देशी गायीला राज्यमाता- गोमाता दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई, दि. ३० : भारतीय संस्कृतीत गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे,देशी  गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.  मंत्री श्री. विखे पाटील यांनी सर्व मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व आहे.

राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्वामुळे गायीला कामधेनू संबोधले जाते. परंतू मागील काही काळापासून  देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता- गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली. राज्यात देशी गायीला विशेष दर्जा दिल्याने देशी गायीच्या गोवंश संवर्धनास प्रोत्साहन मिळणार आहे.

देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान

राज्यातील गो शाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, हा निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गोशाळा पडताळणी समिती असेल. २०१९ मधील २० व्या पशु गणनेनुसार देशी गायींची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी कमी असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या १९व्या पशुगणनेशी तुलना करता २०.६९ टक्क्यांनी कमी झाली आहे.

००००

किरण वाघ/विसंअ/