दैनिक लोकसत्ताचा वर्धापनदिन कार्यक्रम

मुंबई, दि.६: – मुंबई एमएमआर क्षेत्राचा कायापालट झाल्याने ते नवे ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात भव्य असे थीम पार्क विकसित केले जाईल. ते ऑक्सिजन पार्क असेल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

दैनिक लोकसत्ताच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, यांच्या हस्ते लोकसत्ता ‘वर्षवेध २०२३’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी इंडियन एक्स्प्रेस वृत समुहाचे संचालक विनीत गोयंका, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शासनाच्या गत वीस महिन्यातील वाटचालीचाही आढावाच घेतला. ते म्हणाले की, शपथविधी नंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच आम्ही आपले शासन सर्व सामान्य नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे असेल असा निर्धार केला होता. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास असा ध्यास घेऊन कामाला सुरुवात केली होती. आज महाराष्ट्रात सर्वाधिक पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू, मेट्रोचे जाळे, सागरी किनारा मार्ग हे सर्व गेमचेंजर प्रकल्प आहेत. या सुविधांमुळे त्या त्या प्रदेशाचा कायापालट होणार आहे. समृद्धी महामार्गावर १८ ठिकाणी नोड आहेत, याठिकाणी विकासाची केंद्र उभी राहतील. अटल सेतूमुळे मुंबई एमएमआर क्षेत्राचा कायापालट होईल. ते नवे आर्थिक विकास केंद्र आणि मुंबई बरोबरच देशाचे नवे ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य असल्याचा उल्लेख केला. दावोस मधील जागतिक आर्थिक परिषदेतून सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा जगभर सन्मान केला जातो. त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, आपले राज्य उद्योगस्नेही, उद्योजकताभिमुख आहे. आपल्याकडे उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक त्या गोष्टी आहेत. यात कुशल मनुष्यबळ आणि उद्योगस्नेही धोरण यांचा समावेश आहे. आपण पर्यावरणाचीही काळजी घेतो. त्यामुळे उद्योजकाचीही आपल्या राज्याला पसंती असते.

लोकसत्ताच्या मराठी भाषा जतन-संवर्धनाच्या भुमिकेचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. परखड लेखन आणि विश्वासार्ह बातम्या यासाठी लोकसत्ताने आपले वेगळे स्थान निर्माण केल्याचेही ते म्हणाले.

0000