धर्म व समुदायाच्या नावावर गैरसमज पसरवणाऱ्या ५ जणांवर नांदेडमध्ये गुन्हे दाखल

नांदेड दि.१०: ऐन निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्या ५ जणांवर नांदेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. धार्मिक व जातीय विषयांवरून लोकांची माथी भडकवणाऱ्या या गुन्हेगारांवर जिल्ह्याच्या पाच पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहे.

निवडणुकीमध्ये जात, धर्म, पंथ ,याचा वापर करू नये, असे आदर्श आचारसंहितेमध्ये निर्देश असतानाही ऐन निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने काही पोस्ट तयार करणाऱ्या पाच जणांना सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने शोधून काढले आहे. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या अंतर्गत ही समिती कार्यरत कार्यरत आहे.

धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्यावर हिमायतनगरमध्ये 295 (अ) अंतर्गत, मुखेडमध्ये 505 ( 2), अर्धापूरमध्ये 505 (2) व 506 ( दोन आरोपी ) माहूर 505 (2) असा दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपशील आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची नावे जाहीर केली नाहीत. निवडणुका लागल्यापासून पाच जणांवर गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

तथापि, तरुणांनी निवडणूक काळामध्ये जाती धर्माच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही पोस्ट फॉरवर्ड करू नये. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर आल्यानंतर एकमेकांची डोकी गरम करण्यापेक्षा व अफवा पसरविण्यापेक्षा थेट माहिती नांदेड पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

शहरात सण,उत्सवाचा व निवडणुकीचा काळ असताना काही समाजकंटक हेतूपुरस्सर अशा पोस्ट टाकतात. काही पोस्ट या जुन्या असतात, तर काही कुठल्या अन्य राज्यातील असतात. त्यामुळे अशा कुठल्याही पोस्टमुळे तणाव निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी जागृत असावे. आपल्या घरातील तरुणांना यापासून दूर ठेवावे. कोणत्याही पोस्टवर मत बनवू नये. तसेच विचलित होऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

थेट संपर्क साधा….

आक्षेपार्ह काही पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 83O82741OO हा क्रमांक दिला असून यावर अशा पद्धतीने काही आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.

०००