धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदारांसाठी १०० व्हिलचेअर उपलब्ध

धुळे, दि. १२ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रियेमध्ये 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर सहज सुलभतेने ये-जा करता येण्यासाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यासाठी 100 व्हिलचेअर उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर हे विधानसभा मतदार संघ लोकसभा निवडणूकीकरीता 01-नंदुरबार लोकसभा मतदार संघात येतात. या मतदार संघासाठी सोमवार, 13 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदाता यांची ज्या मतदान केंद्रावर संख्या जास्त आहे. त्या मतदान केंद्रावर या व्हीलचेअर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ व दिव्यांग मतदार मतदान केंद्रावर सहज सुलभतेने ये-जा करु शकणार आहे. याकरीता शिरपूर विधानसभा मतदार संघासाठी 50 तर साक्री विधानसभा मतदार संघासाठी 50 व्हिलचेअर वितरीत करण्यात आल्या आहे. या व्हीलचेअर 20 मे 2024 रोजी होणाऱ्या धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूकीतही मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

०००