धुळे लोकसभा मतदारसंघ पूर्वपीठिकेचे जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन

धुळे, दिनांक 12 एप्रिल, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे यांनी 18 वी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 02-धुळे लोकसभा मतदारसंघाची पूर्वपीठिका तयार केली आहे. या पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रकाशन समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे,जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसिलदार पंकज पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला असून निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरवात झाली आहे. या निवडणूक प्रक्रियेत शासनाचा प्रत्येक विभाग सहभागी होत असून लोकसभा निवडणूक हे एक टीम वर्क आहे. यात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे यांचाही सहभाग महत्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे यांनी 02-धुळे लोकसभा मतदारसंघाची पूर्वपिठिका प्रकाशित केली आहे. हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असा आहे. लोकसभा निवडणूक निष्पक्षरित्या पार पाडण्यात माध्यमांची भूमिका मोलाची आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पारंपारिक प्रचाराबरोबरच सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. अशा परिस्थितीत निवडणूकीचे वार्तांकन करणाऱ्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मिडीया यासारख्या माध्यमांना तसेच राजकीय विश्लेषकांना ही पूर्वपीठिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल.

जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचे वार्तांकन करतांना माध्यमांना मागील निवडणुकीचे संदर्भ वेळोवेळी लागतात. या पूर्वपीठिकेत विविध स्वरुपाची आकडेवारी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये 1952 ते 2019 पर्यंतच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार, त्यांना मिळालेली मते, मतदानाशी निगडीत आकडेवारी, मतदारसंघाचे नकाशे, धुळे लोकसभा मतदार संघाचे सन 2024 चे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेत सहभागी महत्वाचे अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, पुरुष व महिला मतदार, मतदान केंद्र आदि माहिती समाविष्ठ करण्यात आली आहेत. लोकसभेचा धुळे मतदारसंघ हा धुळे व नाशिक या दोन जिल्हृयात विस्तारलेला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील माध्यमांना ही पूर्वपीठिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरणार आहे.

या पूर्वपीठिकेच्या निर्मितीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक ज्ञानोबा इगवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पूर्वपीठिकेतील माहिती संकलन व संपादनासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे येथील माहिती सहायक संदीप गावित, वरिष्ठ लिपिक बंडू चौरे, लिपिक चैतन्य मोरे, इस्माईल मणियार, ऋषीकेश येवले यांनी परिश्रम घेतले.

00000