नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ साकारु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. 3 – नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू विदर्भातून घडावेत यासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडासुविधा खेळाडूंना मिळाल्या पाहिजेत. यासाठी 684 कोटी रुपये निधी आपण उपलब्ध करून दिला असून नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ आपण लवकर साकारू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

मानकापूर परिसरातील क्रीडा केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते.

यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आ. टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त अभिजित चौधरी ,  जिल्हाधिकारी  विपीन इटनकर,  क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व मान्यवर उपस्थित होते.

बालेवाडीसारख्या क्रीडा सुविधा व प्रशिक्षण नागपुरात मिळव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आता या क्रीडा केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक क्रीडासुविधा व प्रशिक्षण आपल्याला देता येईल. विदर्भातील खेळाडूंना त्यांच्या आवडत्या खेळामध्ये रुची वाढावी, त्यांच्या मनातील आधुनिक दालने इथे व्हावीत अशी आमची भूमिका आहे.  करायचे तर वर्डक्लास हवे हा आम्ही  आग्रह ठेवला असून सर्व प्रकारच्या सुविधा व प्रशिक्षण आम्ही या नवीन क्रीडा केंद्राच्या माध्यमातून देऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आधुनिक स्पोर्ट्स सुविधेसाठी नवा आयाम केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिला. नागपूरचे, विदर्भातील घडणारे खेळाडू आपल्या देशाचे नाव पुढे नेण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, स्वप्नवत वाटेल असे हे केंद्र असणार असून नगपुरसाठी ऐतिहासिक दिवस आहे. खेळातून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडते, तसा विकास होतो असे ते म्हणाले.

या संपूर्ण क्रीडा केंद्राची जागा लक्षात घेता मोठ्या प्रमाणात रूफटॉपवर सौर पॅनलद्वारे ऊर्जा निर्मिती याठिकाणी आपल्याला करता येईल.  शिवाय परिसरात झाडांच्या लागवडीतून हा परिसर अधिक निसर्गपूरक  आपल्याला करता येईल असे त्यांनी सांगितले.

या क्रीडा संकुलात इतर सुविधांसोबतच ४५० बेडेड (मुला-मुलींसाठी) होस्टेल सुविधा, अद्ययावत जिमनॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, संकुलात येणाऱ्या खेळाडू व नागरिकांसाठी अल्पोपहार व भोजन व्यवस्थेसाठी कॅफेटेरीया सुविधा, सर्व सुविधांसाठी आऊटडोअर व इनडोअर लाईटिंग सिस्टिम, सर्व क्रीडा सुविधांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हारवेस्टिंग, ग्रीन बिल्डींग रिक्वारमेंट फॅसिलीटी, सिवेज ट्रीटमेंट प्लान, लॅन्डस्केपींग इत्यादी सुविधा निर्माण करून देण्यात येत आहेत. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे, नवोदित खेळाडू व पालकांना क्रीडा क्षेत्राबाबत समुपदेशन व मार्गदर्शन सुविधा, क्रीडापटू घडवण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी व सुविधा उपलब्ध होतील. पुढील 3 वर्षात  हे केंद्र खेळाडूंसाठी उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.