रायगड जिमाका दि. 6 – निवडणूक हा भारतीय लोकशाहीचा मोठा सर्वात उत्सव आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. समाजातील सर्व घटकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील असून एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही,याकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
बांगलादेश, झिम्बाब्वे, श्रीलंका, कझाकिस्तान या देशाचे प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर रायगड लोकसभा मतदार संघात २ दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी आले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या माहितीसत्रात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. किशन जावळे ह्यांनी विदेशी प्रतिनिधींच्या मंडळाला मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, केंद्रीय निरीक्षक संजीवकुमार झा, केंद्रीय खर्च निरीक्षक धिरेंद्रमणी त्रिपाठी यांसह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या चर्चेत विदेशी बांग्लादेशचे 2 प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी , जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी) कझाकिस्तान देशाचे 2 प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन(केंद्रीय निवडणूक आयोग कझाकीस्तान), श्रीलंका देशाच्या सिलया हिलक्का पासिलीना(संचालक श्रीलंका) झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) हे सहभागी झाले होते.
यावेळी श्री जावळे यांनी ईव्हीएम- व्हीव्हीपॅट, आयटी उपक्रम, मतदार नोंदणी प्रक्रिया, विविध आय टी अप्लिकेशन, यंत्रणा प्रशिक्षण, रायगड जिल्हा माहिती तसेच मतदार जनजागृतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.तसेच निवडणूक काळात माध्यमे आणि समाज माध्यम यांची भूमिका यावर सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
केंद्रीय निरीक्षक श्री. झा ह्यांनी मतदानाची टक्केवारी वाढावी ह्याकरिता प्रशासनाने राबविलेल्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहचल्याने समाधान व्यक्त केले व कोणताही मतदार निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहू नये ह्या साठी सर्वतोपरी प्रयत्न करावे अशी आशा व्यक्त केली.
केंद्रीय खर्च निरीक्षक धिरेंद्रमणी त्रिपाठी यांनी निवडणूक काळात उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाचे निर्देश आणि त्याची अतिशय पारदर्शी पद्धतीने होणारी अंमलबजावणी याबाबत माहिती दिली.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनाची माहिती दिली.
यावेळी विदेशी प्रतिनिधी यांनी मोठ्या मतदारसंख्येचे नियोजन कसे केले जाते. प्रत्यक्ष कार्यक्रम राबविण्यात येणाऱ्या अडचणी याबाबत माहिती घेतली. तसेच निवडणूक खर्च विहित पद्धतीने आणि मर्यादेत होण्यासाठी निवडणूक आयोगाची कार्यवाही जाणून घेतली. या काळात सुरक्षा व्यवस्था कशी हाताळली जाते याबाबतही त्यांनी माहिती घेतली.
ह्या बैठकीनंतर, विदेशी प्रतिनिधींच्या मंडळाने मीडिया सेंटर ला भेट देऊन सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया वर सविस्तर चर्चा केली. उमेदवारारमार्फत चुकीची माहिती,दिशाभूल करणारी आश्वासाने किंवा माध्यमांवर होणार खर्च ह्याविषयावर सर्व देशांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी मिडीया सेलमार्फत उत्तमरीतीने माध्यमे हाताळले जात असल्याबद्दल माध्यम कक्षाचे कौतुक केले.
00000