पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण

यवतमाळ, दि.1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त येथील समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वणी तालुक्यातील गणेशपुर साझाचे तलाठी सुमेध भिमराव अघम यांना आदर्श तलाठी पुरस्कार देण्यात आला. जामवाडी घाटात डिझल टॅंकरला अपघात होऊन लागलेली आग विझविण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामासाठी नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी विनोद खरात यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

आपल्या 29 वर्षाच्या पोलिस सेवेत चोखपणे कर्तव्य बजावल्याबद्दल पोलिस हवालदार संतोष पांडे तसेच 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ, नवी दिल्ली येथील कार्यक्रमात तुतारी वाजविण्याची संधी मिळाल्याबद्दल महिला पोलिस कर्मचारी सुषमा मारोती मेश्राम यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

000