प्रजासत्ताक दिन उत्साहात

छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका):-  जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध असून विकासासोबत आरोग्य व स्वच्छतेसही प्राधान्य दिले जात आहे. आपण सारे मिळून आपले शहर, आपले गाव स्वच्छ करुन त्यात आरोग्यदायक वातावरणाची निर्मिती करण्याचा संकल्प करु या, अशा शब्दात राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज जिल्हावासीयांना आवाहन केले. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात त्यांनी संबोधित केले.

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा देवगिरी मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. आबालवृद्ध नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, शासकीय अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी आदी या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यास  विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपायुक्त जगदिश मिनीयार, डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, प्रकाश जोशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके,  जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी रोहयो अर्चना खेतमाळीस  तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

ध्वजारोहण आणि शानदार संचलन

देवगिरी मैदानावर पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस वाद्यवृंदाने वाजविलेल्या राष्ट्रगीत, राज्यगीताने वातावरण भारावून गेले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित पोलीस दल संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्विकारली.

त्यानंतर उपस्थितांना उद्देशून पालकमंत्री भुमरे म्हणाले की, आजच्या दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्य घटनेचा अंगिकार करुन आपण प्रजासत्ताक राष्ट्र झालो.  जगामध्ये सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे. स्वातंत्र्यासाठी त्याग बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक तसेच हुतात्म्यांना अभिवादन करुन त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, या देशाचे नागरिक म्हणून लोकशाही मूल्यांची जपणूक करणे, संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी मतदानाचा हक्क बजावून पार पाडावयाची आहे. आपली लोकशाही बळकट करण्याची शपथ घेऊ या,असे आवाहन त्यांनी केले.

त्यांनी सांगितले की, शासन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २१ कोटी रुपयांची मदत शासनाने मंजूर केली  असून अडीच लाखांहून जास्त शेतकऱ्यांना  दिलासा मिळाला आहे. ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन होत असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नांदूर मध्यमेश्वर, जायकवाडी प्रकल्पांच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. जायकवाडी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाण्याची आवर्तने सोडुन  शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीत दिलासा देण्याचे काम केले आहे. वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत ९ हजार खातेदारांना  १०० टक्के अनुदानाचा लाभ देण्यात आला. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्याचे नियोजन करण्यात आले. महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात सुमारे १ लाख ४० हजार कुटुंबातील अडीच लाख व्यक्तिंना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. वर्षभरात २३६ कोटी रुपये खर्च झाला असून  त्यापैकी १७८ कोटी रुपये अकुशल तर ५४ कोटी रुपये  कुशल कामांवर खर्च झाला असून आपला जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त शहरात वाचनालयांचा विकास करण्यासाठी ही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यातून साकारलेल्या  ३८ वाचनालयांचे लोकार्पण होत आहे. अमृत उद्योग योजनेअंतर्गत लघु व सुक्ष्म उद्योजकांसाठी १८ कोटी १५ लाख रुपये खर्चून दोन हजार स्क्वेअर फुटाचे बांधीव गाळे बांधकाम करण्यात येत आहेत. त्यात चिकलठाणा येथे २५ तर वाळूज येथे ४४ गाळे उपलब्ध होणार आहेत, असे सांगून जिल्ह्यातील उद्योग, पर्यटन, कृषी विकासासाठी होत असलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला.

पुरस्कारांचे वितरण

या सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल  अधिकारी- कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

पोलीस दलातील पुरस्कार

उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, राखीव पोलीस निरीक्षक अण्णा वाघमोडे,  श्रीमती गिता बागवडे, सहायक पोलीस निरीक्षक काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप सोळंके, प्रवीण वाघ, शहाबाज पठाण, हवलदार सतिष जाधव, संदीप तायडे, नवनाथ खांडेकर, शाम आडे,  गृहरक्षक दलाचे योगेश जाधव.

क्रीडा पुरस्कार

अभय शिंदे, इंद्रजीत महिंद्रकर, ऋग्वेद जोशी, निधी धर्माधिकारी, सायली वझरकर, वैदेही लोहिया, दीपक रुईकर, देविदास झीटे, मोहितसिंग, स्वरुपा कोठावळे, प्रवीण शिंदे, गौरव म्हस्के, नयन निर्मळ, सुरेश बहुले

गुणवंत कामगार पुरस्कार

बजरंग साळूंखे, विजयकुमार पांचाळ, भारत शिंदे,  रमेश शिंदे, श्रीराम कुलकर्णी, सतिषकुमार कोरडे, दिगंबर शिंदे, नवनाथ बोडखे.

सैनिक कल्याण विभागाअंतर्गत ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सैनिक कल्याण अधिकारी मेजर सैय्यदा फिरासर यांना सन्मानीत करण्यात आले.

त्यानंतर ब्रह्मगव्हाण उपसासिंचन योजनेत खेरडा, दावरवाडी, सोनवाडी खु., हर्षी खु. हर्षी बु., थेरगाव, वडजी येथील भूसंपादनाचा मावेजा वाटप करण्यात आला.

०००००