प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेस अलोट जनसागर

यवतमाळ,दि.२८ : यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण व लाभ वितरण कार्यक्रमासाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला अभूतपूर्व जनसागर लोटला होता. या सभेला जिल्हाभरातील बचत गटाच्या महिलांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधणारी होती.

यवतमाळ शहराजवळील डोरली येथे आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या सभेला जिल्ह्यातील अंदाजित तीन लाखहून अधिक महिला, शेतकरी, युवकांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

या कार्यक्रमात वर्धा – कळंब रेल्वे मार्ग या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ, न्यू आष्टी-अंमळनेर रेल्वे, अंमळनेर- न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ, पीएम किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण, यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण, आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्डचे वितरण, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा प्रकल्पांचे लोकार्पण, बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील ४५ सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण, रस्त्यांचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रधानमंत्री मोदी या सभास्थळी पोहोचताच उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण सभास्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रधानमंत्री मोदी यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी महिला अत्यंत शिस्तबद्ध रितीने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण कार्यक्रमाचे केलेले नियोजन उल्लेखनीय ठरले. या जाहीर कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकारही घडला नाही ही बाब प्रामुख्याने लक्षवेधी ठरली.

या सभास्थळी विविध विभागांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनीही लोकांचे योजनांविषयी प्रबोधन केले. या कार्यक्रमात कलावंतांनी गीतगायन, भावगीत, आदी समाज प्रबोधनात्मक संदेशाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील महिला, शेतकरी, नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

 ०००