फळ पीक विमा योजनेत संबंधित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. 12 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षात राबविण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली असून मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळ पिकांचा विमा शेतकऱ्यांनी भरून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

या हंगामात राज्यात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, पपई, काजू, स्ट्रॉबेरी व द्राक्ष क इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे. ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलियांज, फ्युचर जनरल आणि युनिव्हर्सल सोम्पो या चार कंपन्यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे.

मृग बहरात द्राक्ष क, संत्रा, पेरू, लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 25 जून निश्चित करण्यात आली आहे; त्याचबरोबर मोसंबी चिकू 30 जून, डाळिंब 14 जुलै तर सीताफळ पिकासाठी 31 जुलै ही मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान 2024 ते 26 या दोन वर्षात राबविण्यात येणाऱ्या फळपिक विमा योजनेचे स्वरूप, विमा संरक्षित रक्कम यांसह सविस्तर माहिती कृषी विभागाकडून जारी करण्यात आली असून, फळ उत्पादक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आपला विमा भरून घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/