बारीपाडा येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर

मुंबई, दि. २७ :  वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वीस लाख रुपये असे आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या पुरस्काराबद्दल मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले आहे. चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात ३ मार्च रोजी श्री. पवार यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

राज्य शासनाने या पुरस्कार निवडीचा शासन निर्णय जाहीर करुन श्री. चैत्राम पवार यांच्या नावाची घोषणा केली. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, सक्षमीकरण, स्वावलंबन, वनहक्क कायदा, कृषि विकास आणि शाश्वत विकास या विषयांवर मागील २६ वर्षापासून श्री. पवार हे आदिवासी समाजासोबत काम करीत आहेत. वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास 100 गावांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार केला आहे. सध्या श्री. पवार हे मराठवाडा आणि खान्देश भागासाठी या वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

वनभूषण पुरस्कार निवडीबद्दल मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले असून श्री. पवार यांचे आदिवासी क्षेत्रातील वनजमिनींच्या अनुषंगाने केलेले काम मोलाचे असल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या वन विभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्थानिक नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहित करणे, राखीव वनक्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातील गावात वृक्षलागवड आणि वनसंवर्धन आणि पर्यावरणासाठी त्यांचे काम उल्लेखनीय आणि इतरांना प्रेरित करणारे आहे, अशा शब्दांत श्री. मुनगंटीवार यांनी कौतुकोद्गार काढले.

चैत्राम पवार यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले असून धुळे जिल्ह्यात ते नियमितपणे अद्यावत केले जाते. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापर, मृद व जलसंधारणाची कामे, सौर ऊर्जेचा वापर, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे.

चैत्राम पवार यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविले गेले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी-2003, भारत जैवविविधता पुरस्कार -2014, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार, आदिवासी अस्मिता पुरस्कार, नातू फौंडेशन सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, संस्कार कवच पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाचा जलनायक पुरस्कार आदींचा समावेश आहे.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/