मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या ‘मिशन साद’ उपक्रमाला सुरूवात
‘उमंग’ आणि ‘आरबीएसके’च्या सहाय्याने राबविला जाणार उपक्रम
जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची होणार तपासणी
प्रत्येक अंगणवाडीत होणार आरोग्य आणि शारीरिक तपासणी शिबीर
लातूर, दि. १६ : जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील श्रवणदोष असलेल्या बालकांचा शोध घेवून, त्यांच्यावर वेळीच आवश्यक उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासाने ‘मिशन साद’ हा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. उमंग इन्स्टिट्यूट आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम चमूच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार असून क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी संगीता टकले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, शरद झाडके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जावेद शेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, उमंग इन्स्टिट्यूट डॉ. प्रशांत उटगे, डॉ. अपर्णा उटगे, किरण उटगे, डॉ. श्रीशैलम तलारी, डॉ. गणेश डोंगरे, डॉ. विरेश मयनाळे, डॉ. प्रतीक केंद्रे, डॉ. वैभव उटगे, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. अर्जून राठोड, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमची टीम, उमंगचे व्यवस्थापक ॲड. श्रीहरी गोरे, रामेश्वर जाधव यावेळी उपस्थित होते.
एक हजारातील ५ मुलांमध्ये श्रवणदोष आढळून येतो. यावर वेळीच उपचार न झाल्यास या मुलांना कायमस्वरूपी बहिरेपणा येतो. ऐकण्याची क्षमता नसल्याने संभाषण क्षमतेवरही परिणाम होवून या मुलांमध्ये ऐकण्याचे व बोलण्याचे दिव्यांगत्व येते. त्यामुळे जिल्ह्यातील अशा बालकांचा वेळीच शोध घेवून त्यांच्यावर आवश्यक उपचार करणे आणि लातूर जिल्हा श्रवणदोष मुक्त करण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाने ‘मिशन साद’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
ग्रामीण भागातील पालकांना आपल्या बालकांमधील श्रवणदोषासारखे आजार, दिव्यांगत्व लवकर लक्षात येत नाही. किंवा त्यावर काय उपचार केले जातात, याची माहिती त्यांना नसते. त्यामुळे श्रवणदोषाचे निदान आणि उपचारासही विलंब होवून बालकांमध्ये दिव्यांगत्व निर्माण होण्याची होते. हे टाळण्यासाठी ‘मिशन साद’ अंतर्गत उमंग आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमचे चमू प्रत्येक अंगणवाडीमध्ये जावून शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करणार आहे.
या आरोग्य तपासणीमध्ये श्रवणदोष आढळणाऱ्या बालकांवर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यकता असल्यास कॉक्लिअर इम्प्लांट सारख्या शस्त्रक्रिया करून बालकांमधील श्रवणदोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमासाठी कोणताही स्वतंत्र निधी उपलब्ध नसल्याने कॉक्लिअर इम्प्लांट सारख्या खर्चिक शस्त्रक्रियेसाठी सीएसआर निधीतून सहाय्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे डॉ. उटगे यावेळी म्हणाले.
श्रवणदोष असलेल्या बालकांवर शून्य ते सहा वर्षे या वयातच आवश्यक उपचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक गावात आणि प्रत्येक अंगणवाडीमध्ये जाऊन बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. बालकांमधील श्रवणदोष दूर करून भविष्यात लातूर जिल्हा ‘श्रवणदोष मुक्त’ केला जाणार आहे. त्यामुळे शेकडो मुलांमधील श्रवणाचे आणि बोलण्याबाबतचे दिव्यांगत्व दूर होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.
‘मिशन साद’साठी सीएसआर अंतर्गत निधी देण्यासाठी प्रयत्न करणार : मंत्री श्री. बनसोडे
जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला ‘मिशन साद’ हा उपक्रम लातूर जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्यासाठी सुरु करण्यात आलेला हा उपक्रम राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल. या उपक्रमातून जास्तीत जास्त बालकांचा श्रवणदोष दूर होण्यासाठी, त्यांना चांगले उपचार मिळण्यासाठी या उपक्रमाला सीएसआर निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी सांगितले. श्रवणदोष दूर करण्यासाठी यापूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या, तसेच उपचार सुरु असलेल्या बालकांना यावेळी मंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते औषधीचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी बालकांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या फिरत्या तपासणी आणि उपचार केंद्राला मंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी त्यांनी फिरत्या तपासणी आणि उपचार केंद्रातील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.
०००