भारताच्या विकास यात्रेत युएईची महत्त्वाची भूमिका – केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल

हॉटेल ट्रायडेंट येथे भारत – युएई व्यापार परिषदेचा समारोप

मुंबई, दि. १०: भारताला 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारत सर्वच क्षेत्रात प्रगतीची झेप घेत आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत आहे. देश लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येणार आहे. ‘युएई’ हा भारताचा सर्वात जवळचा मित्र असून या दोन्ही देशातील संबंध फार पूर्वीपासूनचे आहेत. भारताला विकसित राष्ट्र करण्याच्या या विकास यात्रेत यूएईची भूमिका महत्वाची राहणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आज केले.

हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित भारत – युएई व्यापार परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात मंत्री श्री. गोयल बोलत होते. कार्यक्रमाला यूएई येथील अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद झायद अल नाहयान, युएईचे परकीय व्यापार मंत्री डॉ. थानी अल झेयुदी, सीआयआय (कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) चे अध्यक्ष संजीव पुरी, महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांच्यासह दोन्ही देशातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योजक, गुंतवणूकदार उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. गोयल म्हणाले, भारत आणि युएई पायाभूत सोयी सुविधांचा विकास, कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, नवीनीकरणीय ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, हवाई वाहतूक, मालवाहतूक, जलमार्गाने होणारी वाहतूक या क्षेत्रात सोबत काम करीत आहेत. भारत व युएईमध्ये नाविण्यता, गुंतवणूक आणि शाश्वत विकास यावर भर देण्यात येत आहे. दोन्ही देशातील बदलते संबंध हे विकसित भारत होण्यासाठी पूरक आहेत. या परिषदेमुळे दोन्ही देशांच्या संबंधात नवा अध्याय सुरू झाला आहे, असेही मंत्री श्री. गोयल यांनी सांगितले.

यूएईचे परकीय व्यापार मंत्री डॉ. थानी यांनी या परीषदेमुळे सीइपीए (कॉम्प्रेहेन्सीव्ह इकॉनॉमिक पार्टनर ॲग्रीमेंट) ला बळकटी मिळाली असल्याचे सांगितले. यावेळी युएई व भारतातील विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले.

०००

निलेश तायडे/विसंअ