भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्रालय येथे संपन्न

मुंबई, दि.२७ : भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्रालयातील परिषद सभागृहात माजी मुख्य सचिव तथा मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी सचिव डॉ. विजय सतबीर सिंग, खजिनदार विकास वि. देवधर, कार्यकारी सह सचिव जयराज चौधरी हे उपस्थित होते.

अध्यक्ष स्वाधिन क्षत्रिय यांनी संस्थेने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात केलेल्या ठळक कामांची माहिती दिली. यामध्ये ग्रंथालयातील पुस्तकांची संगणकीय यादी अद्ययावत करण्यात आली आहे. संस्थेचे नवीन सदस्य नोंदणी सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी सार्वजनिक प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी एस एस गडकरी पुरस्कार नागपूर विभागीय आयुक्त  विजयालक्ष्मी बिदरी यांना जाहीर करण्यात आला. शाल, प्रमाणपत्र आणि १० हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या नुकसांनीचा इ-पंचनामा महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्राच्या सहाय्याने तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. या उपक्रमाकरिता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

संस्थेच्या वतीने यावर्षी देखील G-२० India Techade व ‘शासन आपल्या दारी’ या विषयांवर बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेचा धनादेश आणि प्रमाणापत्र देवून गौरविण्यात आले.

यामध्ये  श्रेया संजय देसाई, मुंबई प्रथम क्रमांक,  पल्लवी पाटील, कोल्हापूर द्वितीय क्रमांक , नीरज पासवान, नागपूर तृतीय क्रमांक,  प्रिया हितेश कल्याणी, नागपूर,  झेबुनिसा अश्फाक धारवाडकर, सोलापूर,  प्रीती पटेल, नागपूर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या सभेमध्ये भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या संन २०२४-२०२६ या कालावधीसाठीच्या कार्यकारी समितीच्या सभासदांची निवड निवडणूकी द्वारे करण्यात आली.

000000

राजू धोत्रे/विसंअ