मुबंई, दि. १०: राज्यात फळ लागवडीस शेतकरी मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत असून भौगोलिक मानांकने प्राप्त फळांच्या लागवडीस विशेष चालना देण्याच्या दृष्टीने विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना फलोत्पादन मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
मंत्रालयात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत श्री.भुसे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. बैठकीस सचिव जयश्री भोज यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी फलोत्पादन मंत्री श्री. भुसे यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना फळांवरील प्रक्रियेच्या माध्यमातून अधिक लाभ मिळण्याच्यादृष्टीने विभागाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. त्याचसोबत मालेगाव, नाशिक, सोलापूर यासह विविध भागात मोठ्या प्रमाणात डाळिबांचे उत्पादन घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डाळिंबापासून रस निर्मितीच्या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. कृषी विद्यापीठांनीही या संदर्भात संशोधनाचे पूरक तपशील नवीन उपक्रमासाठी घ्यावे. याबाबतीत राज्यस्तरीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन डाळींबाच्या रसनिर्मिती प्रक्रिया केंद्राच्या बाबतीत प्रस्ताव सादर करण्याचे श्री. भुसे यांनी सूचित केले. फळप्रक्रिया बाबतीत इतर राज्यांच्या कामाचा आढावा घेऊन चांगल्या, यशस्वी ठरलेल्या संकल्पनांची पाहणी करावी. शेतकऱ्यांना सोयीचे ठरणारे ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ उभारण्याचे नियोजन करावे, त्या-त्या तालुक्यातील फलोत्पादन पद्धतीनुसार फळ लागवड करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना श्री. भुसे यांनी दिल्या.
यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येत असलेली कामे तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, काजू फळपीक विकास योजना, सिट्रस इस्टेट राज्य योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांच्यासह विविध उपक्रम व योजनांच्या अमंलबजावणीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
०००
काशीबाई थोरात/विसंअ