मतदान केंद्रावर मतदान घेण्यासंबंधी दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार आणि सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर मतदारासंघातील क्षेत्रीय अधिकारी,मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांच्यासाठी मतदान घेण्याबाबतचे  प्रशिक्षण संपन्न..

सोलापूर, दि. २३ (जिमाका): जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील  निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्रावरती मतदान घेण्यासंबंधी दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन येथे सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रीय अधिकारी यांच्याकरिता निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसिलदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, मतदानाचे संपूर्ण कामकाज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे होणार आहे. या निवडणूकमध्ये एम-३, कंट्रोल युनिट, बॅलट युनिट व व्हीव्हीपॅट मशीनचा वापर आहे. यासाठी विहित नियम व मतदान केंद्रातील मतदान प्रक्रियेसंबधी प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक वाचा तसेच भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा.

उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी संतोष देशमुख यांनी पीपीटीद्वारे मतदान केंद्राची तयारी, मॉक पोल घेणे, प्रत्यक्ष मतदानासाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तयार करणे, सर्व मशीन्स सीलबंद करणे, मतदान प्रक्रियेसंबधी विविध प्रपत्रे भरणे, मतदान यंत्रे, मतदान साहित्य व सीलबंद पाकिटे जमा करणे याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मतदान पथकाची जबाबदारी, मतदान प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे, मतदानापूर्वी मतदान दरम्यान आणि मतदान संपल्यावर येणाऱ्या विविध व वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.

मतदान केंद्राध्य्क्षासाठी काय करावे आणि काय करू नये, हॅंडबुक २०२३, चेकलिस्ट २०२३, आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅट २०२३ मध्ये देण्यात आलेल्या माहितीपुस्तीकेचे वाचन करावे. दिव्यांग मतदारासाठी मतदान केंद्रावर तयार करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करावी. मतदान केंद्रावर व त्याच्या सभोवताली निवडणूक कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

टपाली मतदानापासून  मतदार वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर व माढा मतदारसंघातील एकही मतदार टपाली मतदानापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी काळजी घेऊन या प्रशिक्षणात अत्यंत सूक्ष्मपणे टपाली मतदान प्रक्रिया समजून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

टपाली मतदान पत्रिका प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सर्व टपाली मतदान प्रक्रियेत नेमणूक करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, त्यांना प्रशिक्षण देताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ,अतिरिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ,टपाली मतदान प्रक्रिया नोडल अधिकारी व सदरील सर्व प्रक्रियेत नियुक्त अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते .

टपाली मतदान प्रक्रिया कशी राबविण्यात यावी याबाबत नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सदरील टपाली मतदान प्रक्रिया ही जे शासकीय कर्मचारी आहेत व इतरत्र कार्यरत आहेत , जे 85 वर्षा पेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आहेत, कोविड बाधित असणारे नागरिक , दिव्यांग व्यक्ती व मतदाना दिवशी अत्यवश्यक सेवेत असणार आहे , त्यांच्या करिता राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले . तसेच सदरील सेवा पाहिजे असल्यास पात्र मतदारांनी 12 D अर्ज भरून निवडणुकीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर 5 दिवसाच्या आत निवडणूक निर्णय अधिकाऱ्या पर्यंत पोचविण्यात यावे हे आवश्यक आहे .सदरील अर्ज हे BLO व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. मतदानाच्या 3 दिवस अगोदर सदरील सेवे करिता केंद्र टपाली मतदान प्रक्रिया करिता कार्यान्वित असणार आहेत. त्यामुळे सर्व पात्र मतदान करणाऱ्या मतदारांनी या सेवेचा लाभ घेतला पाहिजे यासाठी कार्यरत कर्मचारी यांनी प्रयत्न करण्याबाबत सूचनाही करण्यात आल्या.