मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

धुळे, दि. १६ (जिमाका) : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या व अखेरच्या टप्प्यासाठी सोमवार, 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, येत्या सोमवारी राज्यात पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून मतदारांना मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था, मतदारांसाठी शेड, मेडीकल किट, मतदार सहाय्यता केंद्राची व्यवस्था करावी. मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठी, मतदार मार्गदर्शिका पुस्तिका तसेच अंध दिव्यांगासाठी ब्रेललिपी वोटर स्लिप मतदारांपर्यंत वेळेत पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उन्हाची तीव्रता तसेच पावसाचे सावट या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या इपीक कार्डाचे वितरण झाल्याची खात्री करावी. एकाच ठिकाणी अधिक मतदान केंद्र असेल तेथे गर्दी टाळण्यासाठी मतदारांना बसण्यासाठी वेटींग रुमची व्यवस्था करावी. सूक्ष्म निरीक्षकांना विविध अहवाल देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावेत. दर दोन तासांनी मतदानाची अचूक आकडेवारी देण्यात यावी. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी. उमेदवारांच्या खर्चावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे, मतदानाच्या काळात सोशल मीडीयावर प्रसारीत होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करावेत. कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी. चेकपोस्टच्या ठिकाणी वाहनांची तपासणी काटेकोरपणे करावी, ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे.

ईव्हीएम मशीन हाताळतांना काळजी घ्यावी. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मतदारांना मोबाईल फोन वापरण्यास प्रतिबंध असल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मतदानाच्या दिवशीचे सर्व अहवाल विहित नमुन्यात आणि विहित वेळेत पाठवावे. मतदानासाठी मतदारांवर कुठलाही दबाव येणार नाही तसेच त्यांना कोणतेही अमिष दाखविले जाणार नाही याची दक्षता घेऊन निवडणूक निर्भय व निरपेक्ष पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.

जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, साक्री व शिरपूर विधानसभाक्षेत्रात मतदान प्रक्रिया पुर्ण झाली असूनही संबंधित क्षेत्रात एसएसटी पक्षक कार्यान्वित करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार दिव्यांगासाठी व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदारांना व्होटर स्लीप तसेच मतदान मार्गदर्शिका पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे.  निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार संघातील 50 टक्के मतदान केंद्रावर वेब कॉस्टींगची सुविधा करण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी 153 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून 17 अतिरिक्त अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहे. ज्याठिकाणी गत पंचवार्षिकेत मतदानाची टक्केवारी कमी होती त्याठिकाणी स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा, मतदान जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, आचार संहिता कक्ष तसेच इतर कक्ष करीत असलेले कार्य, दिव्यांग मतदारांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे श्री.गोयल यांनी यावेळी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी श्री. नरवाडे यांनी मतदार जनजागृती व सहभागीता कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत राबविण्यात आलेल्या व सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच गृहभेटी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहचून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धिवरे यांनी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. यामध्ये कायदा व सुव्यवस्था, चेक पोस्टवरील बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रतिबंधात्मक कारवाई आदिंबाबत माहिती देऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपआपल्या विधानसभा मतदार संघात निवडणुकीबाबत केलेल्या तयारीची माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांनी प्रास्ताविक केले तर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीस सहाय्यक निवडणूक अधिकारी राहुल जाधव (धुळे ग्रामीण), महेश जमदाडे (शिंदखेडा), सीमा अहिरे (धुळे शहर), बबनराव काकडे (बागलाण), नितीन सदगीर (मालेगाव बाह्य), पल्लवी निर्मळ (मालेगाव मध्य), राजय उत्पादन शुल्कच्या अधिक्षक स्वाती काकडे, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपजिल्हाधिकारी संदिप पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

०००