मतदारांसाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा; पाणी, रॅम्प, स्वतंत्र स्वच्छतागृहे, शेड असणार उपलब्ध

मुंबई, दि. १० : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात ५३५२ कायमस्वरूपी तर २०३२ तात्पुरती अशी एकूण ७३८४ मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिव्यांग व वरिष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था, महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि मोबाईल टॉयलेटची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे. उन्हाची अधिक  तीव्रता पाहता यावेळी विशेष म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर  ओ.आर.एस. उपलब्ध असणार आहे. ज्या मतदान केंद्रावर मतदारांची मोठ्या प्रमाणात रांग असेल त्या ठिकाणी तेथील मतदारांना बसण्यासाठी बेंच व चेअर, शेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच वीजपुरवठा, इंटरनेट, फोन कनेक्टिव्हिटी उपलब्ध असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वरिष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

0000

दीपक चव्हाण/वि.सं.अ