‘मतदार जनजागृती’साठी धावले कोल्हापूर

युवक-युवती, नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग
मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दिव्यांग, जेष्ठ धावपटूंचाही सहभाग

कोल्हापूर, दि.7 (जिमाका) : मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या “रन फॉर वोट” लोकशाही दौडमध्ये 6 हजार 359 नागरिक सहभागी झाले. या दौडसाठी 18 वर्षावरील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित दौडमध्ये जिल्ह्यातील मतदार विद्यार्थी, नागरिक यांच्यासह शासकीय व खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दिव्यांग, जेष्ठ धावपटूंचाही सहभाग मिळाला. उत्साहात संपन्न झालेल्या विक्रमी लोकशाही दौडची नोंद आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्डमधे झाली. संबंधित संस्थेकडून नोंदीचे सन्मानपत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिकेयन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. दौडमधे सहभागी होण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. दौडच्या आयोजनामधे महत्त्वपूर्ण काम केलेले स्वीपचे नोडल अधिकारी नीलकंठ करे, सहायक नोडल वर्षा परिट, श्री. धायगुडे उपस्थित होते. पोलीस तसेच वाहतूक विभागाने धावपटूंच्या सुरक्षेसह वाहतूक मार्ग नियोजन पाहिले तर आरोग्य विभगाकडून आवश्यक मदत जागोजागी देण्यात आली होती.

लोकशाही दौडसाठी सकाळी 6 वाजता कसबा बावड्यातील पोलीस परेड मैदानावर सकाळी 6 वाजता 18 वर्षांवरील हजारो नागरिक एकत्र जमले. सकाळी 6.30 वाजता 10 कि.मी. ची दौड त्यानंतर 6.40 वाजता 5 कि.मी. तर 6.50 वाजता 3 कि.मी. ची दौड सुरु झाली. सर्वात शेवटी दिव्यांगांच्या रॅलीला जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने स्वीप अंतर्गत झालेल्या लोकशाही दौडचे “चला धावूया – सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करुया बळकट लोकशाहीसाठी” हे ब्रीद वाक्य होते. या ब्रीद वाक्यासह ‘मी मतदान करणारच’ अशा विविध संदेशांचा समावेश असलेला प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला टीशर्ट नागरिकांनी परिधान केला होता. सुरूवातीला मतदान करण्याबाबतची शपथ सर्व उपस्थितांना दिली. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी व्हावे तसेच दि.7 मे दिवशी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी सहभागी होवून जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवावी, असा संदेश या दौड मधून देण्यात आला.

लोकशाही दौडसाठी सहभागी झालेले नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांची संख्या – जिल्हाधिकारी कार्यालय व त्याअंतर्गत येणारी कार्यालये – 660,  गृह विभाग व त्याअंतर्गत येणारी कार्यालय – 469, सहकार विभाग व त्याअंतर्गत येणारी कार्यालय – 877,  जिल्हापरिषद व पंचायत समिती व त्याअंतर्गत येणारी कार्यालय – 848, महानगरपालिका व त्याअंतर्गत येणारी कार्यालय – 950, वित्त विभाग व त्याअंतर्गत येणारी कार्यालय – 43, विधी व न्याय विभाग व त्याअंतर्गत येणारी कार्यालय – 29, कृषी विभाग व त्याअंतर्गत येणारी कार्यालय – 27, वन विभाग व त्याअंतर्गत येणारी कार्यालय – 5, सार्वजनिक बांधकाम विभाग व त्याअंतर्गत येणारी कार्यालय – 15, आरोग्य विभाग व त्याअंतर्गत येणारी कार्यालय – 211, इतर कार्यालय – 488, पदवीचे विद्यार्थी – 938, इयत्ता 11 वी 12 वीचे विद्यार्थी – 141 तर जागरूक नागरिक – 658 उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्डमधे नोंद – काही दिवसांपुर्वीच मानवी रांगोळीचे यशस्वी आयोजन करून प्रशासनाने त्याचीही नोंद राष्ट्रीय स्तरावर केली होती. याचपाठोपाठ आता वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मधे लोकशाही दौडचीही नोंद करण्यात आली आहे. 6359 जणांनी मतदानासाठी घेतलेल्या धावेची नोंद विशेष मानली जाणार आहे. कोल्हापूर नेहमीच वेगळे करून सर्व जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम साजरे करण्यासाठी ओळखले जाते. मतदान टक्केवारीतही दरवेळी कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी राहतो. त्यामधे या विक्रमी जनजागृती कार्यक्रमामुळे निश्चितच वाढ होईल यात शंका नाही.  वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद झाल्याचे संबंधित संस्थेच्या व्यवस्थापकांनी त्याठिकाणी घोषित केल्यानंतर सहभागींमधे एकच जल्लोष पहायाला मिळाला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतली 10 किमीची धाव – सकाळी सुरू झालेल्या लोकशाही दौडमधे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 3,5 आणि 10 किमीसाठी धापणा-या धावपटूंना हिरवा झेंडा दाखवून दौडची सुरूवात केली. यानंतर दिव्यांगांच्या दौडला मार्गस्थ करून स्वत:ही दौडमधे सहभाग घेतला. यावेळी त्यांनी काही दिव्यांगांच्या सायकल चेअरला आधार देत तुम्हीही कशात कमी नाही चला सोबत धावूया जणू काही असा संदेश देत धाव घेतली. जिल्हाधिकारी यांनी तब्बल 10 किमीची धाव पुर्ण करीत सर्व प्रशासनातील उपस्थितांमधे एक चांगला आदर्श निर्माण करून दिला.

स्वीप समितीकडून नियोजन – गेले 15 दिवस झाले या दौडची तयारी करण्याची जबाबदारी निवडणूक प्रक्रियेत काम करीत असलेल्या स्वीप समितीकडे होती. यात नोडल अधिकारी नीलकंठ करे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे कार्य करीत दौड यशस्वी करण्याचे कार्य केले. दौडमधे सहभागींना पाण्याची, अल्पोपहाराची, जागोजागी मतदतीसाठी युवकांची व्यवस्था, नोंदणी केलेल्यांना टी-शर्ट वाटप करणे, दौडची प्रसिद्धी जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे देणे आदी कामांसाठी नियोजन केले.

276 कोल्हापूर उत्तर विस मतदारसंघ कार्यालयाकडून मतदारांना स्टॉलमार्फत मदत – लोकशाही दौडमधे सहभागी मतदारांना मतदार यादी, मतदान प्रक्रियेबाबत तसेच नाव नोंदणीबाबत काही शंका असल्यास त्यांना मदत म्हणून त्याठिकाणी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉल लावण्यात आले होते. याठिकाणी 340 हून अधिक मतदारांनी आपल्या शंकांचे निरसन केले व 34 जणांनी नवीन नोंदणीसाठी फॉर्म 6 घेतला

०००००