मतमोजणी कक्षातील कामकाजाचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  यांच्याकडून आढावा

सांगली, दि. (जिमाका) :  सांगली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्षात सुरू असलेल्या कामकाजाचा सूक्ष्म आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला आणि येथील अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.

४४- सांगली लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या ४ जून २०२४ रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार असून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मतमोजणी कक्षातील कामांची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी सरिता लष्करे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह पोलीस व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, मतमोजणीसाठी आयोगाच्या सुचनांनूसार निश्चित केलेल्या आणि ओळखपत्र वितरीत केलेल्या अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधी यांना प्रवेश असणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेले काम जबाबदारीने पार पडावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी  मतमोजणी कक्षातील सीसीटीव्ही, संगणक, बॅरीगेट, आत येण्याचा व बाहेर जाण्याचे मार्ग, ईव्हीएम मतमोजणी केंद्रात नेण्याचा मार्ग, पोलीस सुरक्षा, माध्यम कक्ष आदी ठिकाणी भेट देवून येथील कामांबाबत  संबंधितांना आवश्यक सूचना केल्या.

जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल यांनी मतमोजणी कक्षातील संगणकीय कामकाज, सीसीटिव्ही व अनुषंगिक कामकाजाबाबत केलेल्या कामांची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली.

०००