मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा    

चंद्रपूर, दि. १६ : निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी हा अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा आहे. किंचीतही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागू शकते. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

नियोजन सभागृह येथे आज (दि.16) मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आढावा घेताना ते बोलत होते. मंचावर सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, शिवनंदा लंगडापुरे, नितीन हिंगोले आदी उपस्थित होते.

19 एप्रिल 2024 रोजी 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली असून ईव्हीएम स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले की, 4 जून रोजी तडाळी येथील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होता कामा नये. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व इतर सर्वजणांचे अतिशय बारकाईने या प्रक्रियेवर लक्ष असते. तसेच उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मतमोजणीची प्रक्रिया समजावून सांगणे / दाखविणे आवश्यक आहे.

पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणेच आणि मॅन्युअलचा अभ्यास करून अतिशय पारदर्शक आणि अचूकपणे मतमोजणी करावयाची आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचा-याने गोपनीयता पाळणे आवश्यक असून कोणीही स्वत:चे मत व्यक्त करू नये तसेच प्रक्रियेची माहिती इतरांना देऊ नये. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अधिकारी , कर्मचाऱ्यांनी तटस्थ असणे गरजेचे आहे. मतमोजणी केंद्रामध्ये अधिकारी, कर्मचारी व इतरांना मोबाईल, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नाही. संपूर्ण प्रक्रियेसाठी तीनवेळा रँडमायझेशन होणार असून ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतमोजणी बाबत सर्वांनीच तयारी करून ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी सादरीकरण केले. तसेच ईव्हीएम मतमोजणीकरीता प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल, पोस्टल बॅलेटकरीता 9 टेबल आणि ईटीपीबीएस मतमोजणी करीता 8 टेबल राहणार आहे. 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेट च्या मतमोजणीला सुरवात होणार असून त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००