मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याची कार्यवाही सुरु
राज्य शासन सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
परभणी, दि.17 (जिमाका): भारतीय स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यासह तीन संस्थाने एकसंघ देशात विलीन होण्यास तयार नव्हती. निजामाच्या जाचातून मुक्त होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात दिलेल्या लढ्यातील योगदान अमूल्य असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा जिल्ह्याचे पालक मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
परभणी येथील राजगोपालचारी उद्यान येथे आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी पालक मंत्री श्री. बनसोडे बोलत होते.
यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नितिशा माथूर, पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपजिल्हाधिकारी श्रीमती संगीता चव्हाण, उप विभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण बळीराम मकरंद, श्रीमती काशिबाई नानासाहेब कुलकर्णी, श्रीमती शशिकलाबाई दौलतराव मोरे, श्रीमती गंगाबाई वामनराव गिरवलकर, श्रीमती झाकेरा बेगम सय्यद आझम, शिवाजी शंकरराव डावरे, श्रीमती सरोजनी धर्माधिकारी यांच्यासह वीरपत्नी, वीर माता, वीरपिता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविण्यासोबतच; जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मदत दिली जाईल, असे सांगून राज्य शासन सर्वसामान्यांच्या हित आणि विकासासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा जिल्ह्याचे पालक मंत्री संजय बनसोडे यांनी प्रतिपादन केले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता. त्यामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, निजामाच्या राजवटीतून मुक्त करून भारतीय संघराज्यात सामील करून घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु करण्यात आला. त्यामुळे या स्वातंत्र्य सैनिकांचे अमूल्य योगदान असल्याचे पालकमंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील हजारो तरुण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या लढयात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी झुंज दिली. प्रसंगी अनेकांनी मृत्युलाही कवटाळले. परभणी जिल्ह्यातील चारठाणा, वालूर, ब्राम्हणी, माळसोन्ना यासह अनेक गावा-गावातून मुक्ती संग्रामाचा लढा स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. विनायकराव चारठाणकर, मुकुंदराव पेडगावकर, दादासाहेब चारठाणकर, शंकरराव खळीकर, हरिहरराव कहाळेकर, श्रीनिवासराव बोरीकर यांच्या बरोबरीने इतर नेत्यांचीसुध्दा कामगिरी उल्लेखनीय आहे. लढ्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचेही योगदान महत्त्वपूर्ण होते. गीताबाई चारठाणकर, शांताबाई पेडगावकर यासह अनेक महिलांनी अनन्यसाधारण कामगिरी बजावल्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्ती संग्रामचे हे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होवून भारतीय संघ राज्यात विलीन झाला. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेचा त्याग सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे. या त्यागाची जाणीव ठेवूनच मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कृषिविषयक सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्य गरज त्यांनी व्यक्त केली.
जनतेच्या हितासाठी राज्य शासन अनेक लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबवित आहे. विशेषत: महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व सक्षमीकरणासाठी शासनाने सुरु केलेल्या “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आपल्या जिल्ह्यात सुमारे 4 लाख 55 हजार महिलांनी नाव नोंदणी केली आहे. यापैकी 3 लाख 54 हजार पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित महिलांना निधी वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना आणि उज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्ह्यात या योजनेतंर्गत 1 लाख 37 हजार 463 पात्र लाभार्थी आहेत. यापैकी 80 हजार 330 लाभार्थ्यांनी गॅस सिलेंडरचे पुनर्भरण करुन घेतले असून, त्याचा सर्वसामान्य गृहिणींना लाभ झाला असल्याचे पालकमंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.
युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. तसेच यासाठी आर्थिक मदत म्हणून विद्यावेतनही देण्यात येणार आहे. राज्यातील 60 वर्ष व त्यावरील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना” सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील मोठ्या तीर्थ स्थळांचे दर्शन घेता येणार असल्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
राज्यातील वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. वयोमानामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच आवश्यक साधने खरेदी करण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे. अतिवृष्टीमुळे जिल्हयात झालेल्या नुकसानीची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची जाणीव ठेवून या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. यावेळी श्री. बनसोडे यांनी स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच श्री. बनसोडे यांनी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार यांची भेट घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.