पूर्वतयारी आढावा बैठक
मुंबई, दि. २ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करावयाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झाली.
या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, कोकण विभागीय उपायुक्त विवेक गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. देशमुख म्हणाले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, बेस्ट, एसटी यांची परिवहन व्यवस्था, सीसीटीव्हीची व्यवस्था, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चैत्यभूमी परिसरातील स्वच्छता, साफ- सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी तसेच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तसेच पोलीस बंदोबस्त याबाबत नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, महापरिनिर्वाण दिन मानवंदना शासकीय कार्यक्रम याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
शैलजा पाटील/विसंअ/
The post महापरिनिर्वाणदिनी येणाऱ्या अनुयायांच्या सोयी-सुविधांचे नियोजन करावे – कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख first appeared on महासंवाद.