महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहन

चंद्रपूर दि. २ : महाराष्ट्र दिनानिमित्त (१ मे) मुख्य शासकीय ध्वजारोहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांच्या हस्ते पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शुभेच्छापर संदेशात जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. नुकताच आपण लोकशाहीचा उत्सव साजरा केला. 19 एप्रिल 2024 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवून मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळेच गत निवडणुकीपेक्षा यावर्षी जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी वरोराच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम (आय.पी.एस.) यांनी पोलिस पथसंचलनाचे नेतृत्व केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी परेडचे निरीक्षण करून उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व इतर अधिका-यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. श्वेता सावळीकर यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तबाबत शपथ दिली.

कार्यक्रमाचे संचालन सहायक पोलिस उपनिरीक्षक उत्तम आवळे आणि पोलिस हवालदार मंगला आसुटकर यांनी केले. तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी मानले. यावेळी मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००