महाराष्ट्र देश व जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ देणार – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

येत्या काळात कौशल्य शिक्षणावर खर्च
खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी २५० हून अधिक प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम

जळगाव, दि. (जिमाका):  येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले.

अमळनेर येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. पाटील बोलत होते. जिल्हा प्रशासनाने यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.

यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी आमदार  शिरीष चौधरी, विद्यापीठाचे सिनेट सदस्य, नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक राजेश पांडे, प्र. कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून विविध अभ्यासक्रमाबरोबर गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अमळनेरच्या उपकेंद्रात स्वतंत्र व्यवस्था व्हावी. या केंद्राचे बांधकाम लवकरात लवकर होईल हे पाहावे, रेल्वेच्या ११ हजार जागांची भरती निघणार आहे. अशा विविध स्पर्धा परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांना माहिती होत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आपली मुलं, मुली दिसत नाहीत. त्यामुळे विनाविलंब हे केंद्र सध्या भाड्याच्या जागेत सुरु करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

आपल्याकडे शिक्षणासाठी इमारती उभ्या करतो, पण अभ्यासासाठी लागणारा ज्ञानसाठा (कन्टेन्ट बिल्डिंग) उभा करण्यात कमी पडतो, ते आता उभं करणं गरजेचे असून जगभरातल्या भाषा आपल्या विद्यार्थ्यांना अवगत व्हाव्यात, अनेक देशांना आपल्याकडून उत्तम मनुष्यबळाची आवश्यकता आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्या दृष्टीने शासन शिक्षणात अमूलाग्र बदल करत असल्याचेही मंत्री श्री.  पाटील यांनी सांगितले.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी २ महिन्यात महसूलची जागा अत्यंत तत्परतेने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला हस्तांतर केल्याबद्दल मंत्री श्री. पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, आमचा तालुका आवर्षणग्रस्त असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च पालकांना झेपणारा नाही. त्यामुळे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अमळनेरचे मुक्त विद्यापीठाचे हे उपकेंद्र अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. खान्देशात जसे मुक्त विद्यापीठाचे केंद्र झाले तसेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापनासाठी एक प्रशिक्षण केंद्र तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच कमी पावसाचा तालुका असलातरी येत्या काळात पाडळसरे धरण होईल, त्यावेळी अमळनेर पाणीदार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या या उपकेंद्राचा फायदा होईल असे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले. श्री. पांडे यांनी अमळनेर मध्ये हे उपकेंद्र सुरु होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कुलगुरू डॉ. सोनावणे यांनी उपकेंद्राचे बांधकाम येत्या आठ महिन्यात पूर्ण करू असे सांगत इथे सर्व  प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र आणि कौशल्य विकास केंद्रही स्थापन केले जाणार असल्याचे सांगितले.

०००