‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

मुंबई दि. २२ : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत ही स्पर्धा जाहीर केली आहे.

‘महाराष्ट्र माझा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, जलसंधारण, जलसंपदा, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन आणि पर्यावरण, वने आदी योजनांशी संबंधित छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेसाठी पाठवता येतील.

प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्र, रिल्स आणि लघुपटांना अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार असून, तीन हजार रुपयांची पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्राप्त झालेल्या छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे, मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच रिल्स आणि लघुपटांना शासनाच्या समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी देण्यात येईल. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची, प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.

 स्पर्धेची नियमावली

१. छायाचित्रण स्पर्धा.

* छायाचित्रे १८x३० इंच HD च्या मानक आकाराची असावीत.

* छायाचित्राची थीम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सुचविलेल्या थीमशी सुसंगत असावी.

* छायाचित्र ही स्वतःची सर्जनशीलता असावी.

* छायाचित्रांमध्ये कोणतेही अनुचित व्हिज्युअल नसावेत.

* कोणतीही कॉपीराईट सामग्री वापरली जाऊ नये.

* छायाचित्राचे तपशीलवार वर्णन अपेक्षित आहे.

* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे छायाचित्रांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्ककडे असतील.

२. रिल्स स्पर्धा.

* रील्ससाठी वेळ मर्यादा कमाल १ मिनिटांपर्यंत असावी.

* असभ्य भाषा, आक्षेपार्ह शब्द याचा वापर यामध्ये करता येणार नाही

* कोणतेही कॉपीराईटचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* स्पर्धा १८ वर्षे आणि त्यावरील सर्वांसाठी खुली असेल

* मानक रील्स स्वरूप अपेक्षित आहे.

* रील्स नवीन असणे आवश्यक आहे आणि विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केले पाहिजे.

* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे रील्सचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्ककडे असतील.

 ३. लघुपट स्पर्धा.

* लघुपटाचा अवधी किमान ३ मिनिटे ते कमाल ५ मिनिटे इतका असावा.

* या स्पर्धेत १८ वर्षावरील कोणीही… भाग घेऊ शकतात.

* लघुपट नवीन असणे आवश्यक आहे. लघुपट विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केलेला असावा.

* अभद्र भाषा, हिंसा, आक्षेपार्ह अपशब्द वापरला जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

* स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या थीम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे लघुपट सादर करणे आवश्यक आहे.

* कोणतेही कॉपीराईट उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* मानक व्हिडिओ स्वरूप MP४ HD १९२० * १०८० अपेक्षित आहे. स्वतंत्र YouTube स्वरूप / X स्वरूप असावे.

* लघुपट मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत बनवला आहे याची खात्री करावी.

* लघुपट HD format मध्ये सबमिट करावा.

भाग घेतलेल्यांचे लघुपटांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क कडे असतील.

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावीत. सोबत आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाइल नंबर आणि छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे.

०००००