महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या नूतन वास्तूचे मुंबईत उद्घाटन

नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे औषध व्यवसाय परिषदेची वेगळी ओळख – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

मुंबई, दि.१३ : फार्मासिस्ट आणि सामान्य नागरिकांसाठी नवनवीन उपक्रम हाती घेऊन औषध व्यवसाय परिषद एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या मुलुंड येथील नूतन वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री श्री.मुश्रीफ बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, परिषदेने मुलुंड येथे स्वमालकीची जागा खरेदी करुन यामध्ये अत्याधुनिक सेवा देणारे कार्यालय, जागतिक स्तराप्रमाणे विकसित औषध माहिती केंद्र  आणि फार्मासिस्टचे ज्ञान व कौशल्य याचे निरंतर प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले सभागृह बनविले आहे. हे राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. फार्मासिस्टचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी व जागतिक स्पर्धेला स्पर्धेनेच उत्तर देण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाची निर्मिती करून कार्यशाळा राज्याच्या तालुका, जिल्हा पातळीवर तज्ञ मार्गदर्शकामार्फत आयोजित केल्या जातात हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे.कारण अपडेट असणे काळजी गरज आहे ते तुम्ही करता.यामुळे परिषद अधिक गुणवत्तापूर्ण काम करेल अशी  खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

आजअखेर महाराष्ट्र राज्यामध्ये ४७९ पदविका (Diploma) आणि ३१२ पदवी (Degree) व फार्म. डी. (Doctor of Pharmacy) ची ७ शासन मान्य फार्मसीची कॉलेज कार्यान्वित आहेत. कायद्याअंतर्गत फार्मसीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- विद्यार्थीनी फार्मसीचा व्यवसाय करणे, उत्पादन क्षेत्रामध्ये महत्वपुर्ण भुमिका बजावणे यासह सरकारी, निमसरकारी सेवा (फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर, फार्मसी इन्स्पेक्टर) करण्यासाठी नियम व अटींच्या आधीन राहून पंजीकरण (नोंदणी) करणे अनिवार्य आहे. आज अखेर ४.३ लाख फार्मासिस्टची नोंदणी परिषदेकडे झाली आहे.

परिषदेचे मागील २५ वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजना कार्यान्वित केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवली आहे.

१९९८ मध्ये परिषदेने संकेतस्थळाची निर्मिती करुन कालानुरुप परिषदेचे सर्व कामकाज नोंदणी, पुर्नर्नोदणी, नूतनीकरण, इ. कामकाज ऑन लाइन पद्धतीने करण्यात येते.

फार्मासिस्ट प्रोफेशनल प्रोफाइल (पी.पी.पी. कार्ड) ची नवीन संकल्पना अंमलात आणून त्याचे स्मार्टकार्डमध्ये रूपांतर केले आहे. यास अन्न आणि औषध प्रशासनाने देखील मान्यता दिली आहे. फार्मासिस्ट, औषध क्षेत्रातील संशोधक, प्राध्यापक, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि नागरीकांना औषधाची माहिती, त्याचे शरीरावर होणारे अनुकूल व प्रतिकूल परिणाम, रासायनिक बदल बाबतची योग्य माहिती मिळू लागली आहे. यासाठी जगप्रसिद्ध Micromedex या डाटाबेस ची उपलब्धता केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

000000000

राजू धोत्रे/विसंअ