महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्यसाठी आयोजित कार्यक्रम

मुंबई,  दि. १३ – महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हॉटेल ताज पॅलेस येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्य, मंत्रिमंडळ सदस्य व मान्यवरांसाठी आयोजित कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज शिष्टाचार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव इकबालसिंग चहल, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह विविध देशातील उच्चायुक्त  उपस्थित होते.

उपस्थित सर्वांना ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण, पायाभूत सोयी सुविधा अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे. राज्याची अर्थ व्यवस्था एक ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. राज्यात उद्योगस्नेही वातावरण आहे. तसेच राज्यात उद्योग उभारणी आणि वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक नेतृत्व दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात देश लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

०००००