महिलांना एमआयडीसीत प्राधान्याने जागा देणार – उद्योगमंत्री उदय सामंत

अमरावती, दि. 27 (जिमाका) : उद्योग क्षेत्रामध्ये राज्य आघाडीवर आहे. उद्योग क्षेत्रामध्येही स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचा टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र भूखंड उपलब्ध करुन दिले जातील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम आज येथे पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, संपूर्ण बाजारपेठेचा उद्योग क्षेत्राशी संबंध येतोच. त्यामुळे सामाजिक सक्षमीकरण करताना उद्योग क्षेत्राचा विचार करावाच लागतो. लाडकी बहिण योजनेतून महिलांचे सक्षमीकरण करीत असताना त्यांना मिळालेल्या मदतीतून बाजारपेठेतील आवश्यक वस्तूंची खरेदी होत असल्यामुळे एका दृष्टीकोनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. त्यामुळे राज्याचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे. विदर्भाचा विकास व्हावा यासाठी नांदगाव पेठ येथे पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रात सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही महत्वाची नांदी आहे.

ग्रामीण पातळीवर रोजगार निर्माण करणारी विश्वकर्मा योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेत 50 हजार नोंदणी झाली, यातील 30 हजार लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले. यात 35 हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण पातळीवरील रोजगारासह मोठे उद्योग राज्यात येण्यासाठी उद्योग विभाग कार्य करीत आहे. राज्यातील एकही उद्योग बाहेर जाऊ दिल्या जाणार नाही. त्यासोबतच गडचिरोली सारख्या जिल्ह्यात स्टील क्षेत्रातील गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या एक वर्षात येथील चित्र बदलेले असेल.

कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. उपेंद्र तोमर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मोनिका उमक यांनी सूत्रसंचालन केले.