महिला सक्षमीकरणाबरोबर नागरिकांना चांगले आरोग्य व शिक्षण देण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकलव्य निवासी शाळा व‌ उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन

धुळे, दि. १० (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साक्री दौऱ्यात महिला सक्षमीकरणाच्या योजनांसोबत सर्वसामान्य नागरिकांना चांगले आरोग्य व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्या उद्देशाने साक्रीसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात एकाच दिवशी ५५ कोटींच्या प्रकल्पांचे ई – भूमिपूजन करण्यात आले.

आदिवासी विकास विभागाच्या भाडणे येथील एकलव्य निवासी शाळेच्या नवीन इमारतीचे ई- भूमिपूजन व साक्री येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे ई – भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

भाडणे, ता.साक्री  येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन कार्यक्रम अभासी पद्धतीने झाला.

अशी आहे एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलची इमारत

धुळे  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या भाडणे एकलव्य रेसिडेंशियल स्कूल (ता.साक्री) या शाळेस २८ मे २०२० रोजी मान्यता मिळाली आहे. सन २०२२-२०२३ वर्षांपासून ही शाळा प्रत्यक्षात सुरु झाली असून सद्यस्थितीत शाळेत इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरु आहेत. तर शाळेस इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे वर्गांस मंजूर मिळाली आहे. या शाळेसाठी इमारत बांधण्यासाठी ३ हेक्टर ९६ आर शासकीय जमीन उपलब्ध झाली असून इमारत बांधकामासाठी ३३ कोटी २५ लक्ष निधी केंद्र शासनाकडून मंजूर झाला आहे. या रक्कमेतून शालेय इमारत बांधकाम, आश्रमशाळेतील मुलांचे व मुलींचे वसतिगृह (४८० विद्यार्थी ), स्वयंपाकघर, भोजनगृह, मुख्याध्यापक निवास, अधीक्षक व अधीक्षिका निवास, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा व स्वच्छता व स्नानगृह, बाह्य सीवरेज व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था सह परिसरातील रस्ते, कंपाउंड वॉल या कामांचा समावेश आहे.

अशी आहे उपजिल्हा रुग्णालय इमारत

साक्री तालुक्यातील भाडणे येथील नूतन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय बांधकामास २ नोव्हेंबर, २०२२ रोजी ३०४१.३५ लक्ष रक्कमेस प्रशासकीय मान्यता  प्राप्त झाली आहे. या इमारत बांधकामासाठी २०९१.८३ बांधकाम अधिक १७५.६६ लक्ष विद्युत काम असे एकूण २२६७.४९ लक्ष खर्चांची निविदा प्राप्त झाली आहे. यात तळमजल्यात नोंदणी रुम, ड्रेसिंग रुम, औषध भांडार, जनरल ओपीडी, सोनोग्राफी रुम, डेंटल रुम, कॅज्युअलटी वार्ड, ब्लड बँक, एक्स रे रुम, महिला , पुरुष व स्टाफसाठी स्वतंत्र बाथरुम व शौचालये, जनरल ओपीडी, पहिला मजल्यावर ४७ बेड्स राहणार असून त्यात १२ बेड्सचा एसएनसीयू वार्ड, १२ बेड्सचा मेंटर्निटी वार्ड, १० बेडेड पेडियाट्रिक वार्ड, १० ऑप्थॅल वॉर्ड, ३ बेडेड लेबर रुम, ओपीडी डॉक्टर रुम, ऑपरेशन थिएटर, रिकवरी रुम, प्रिपरेशन रुम, दुसऱ्या मजलावर ५३ बेड्स राहणार असून १४ बेडेड जनरल वार्ड, १२ बेडेड पुरुष, १२ बेडेड स्त्रियांकरीता सर्जिकल जनरल वार्ड, १५ बेडेड जनरल वार्ड, ३ स्पेशल रुम, २ ऑपरेशन थिएटर, मेडिकल सुपरिटेंडिंग रुम, प्रशासकीय कार्यालय, डॉक्टर्स व नर्स रुम, पार्कीग व पंप हाऊस इत्यादी कामांचा समावेश आहे.

०००

—–०००—-