माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६: राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

दिवंगत पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. याकाळात त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी जवळपास 35 वर्ष प्रतिनीधीत्व केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. आदिवासी बांधवांचे प्रश्न त्यांनी विधानसभेत नेहमीच मांडले. आदिवासी बहुल अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरीता त्यांनी अथक प्रयत्न केले. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी देखील ते नेहमी प्रयत्नशील राहिले.

मी मुख्यमंत्री असताना काही महिन्यांपूर्वी आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांबाबत आदिवासी भागातल्या आमदारांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. आपल्या प्रकृतीची चिंता न करता मधुकरराव या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. यातून त्यांची आदिवासी बांधवाविषयीची तळमळ दिसून येते, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

०००

 

The post माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे first appeared on महासंवाद.