माझी वसुंधरा अभियान ४.0 व स्वच्छ भारत अभियान आढावा बैठक

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील माझी वसुंधरा अभियान 4.0  व स्वच्छ भारत अभियानाचे काम उत्कृष्ट झाले असून 31 मे 2024 अखेर निर्देशकाचे नियोजन करून जनजागृती व लोकसहभागातून अभियान यशस्वी करण्याचे सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित माझी वसुंधरा अभियान 4.0  व स्वच्छ भारत अभियान आढावा बैठक पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुणे विभाग नगरपालिका प्रशासन उपायुक्त दत्तात्रय लाघी, सहाय्यक आयुक्त नगरप्रशासन देवानंद ढेकळे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, संबंधित कर्मचारी उपस्थितीत होते.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मे 2024 पर्यंत मुदत वाढ मिळाली आहे. आढाव्यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात उर्वरित कालावधीत निर्देशाकानुसार नियोजनबद्ध काम करणे आवश्यक आहे. यामध्ये वातावरणीय बदल जनजागृती, ई-प्लेज नोंदणी व पुर्तता, स्पर्धा, सोशल मीडियाद्वारे अभियानाची प्रसिध्दी, सार्वजनिक ठिकाणी जनजागृती उपक्रम, पर्यावरण सेवा येाजनेत शाळांचा सहभाग आदींचा समावेश आहे. जेणेकरून भूमी, वायु, जल, अग्नि, आकाश या क्षेत्रात गुणांकन सुधारता येतील. तसेच, अभियांनाची माहिती संकलन व मुल्यांकनाचा त्रुटींचीही माहिती देवून नियोजनपूर्वक सुधारणा करण्याच्या सूचनांही यावेळी देण्यात आल्या.

स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे प्रकल्पाविषयी माहिती घेण्यात आली.  जिल्ह्यातील मुख्याधिकारी यांनी स्वच्छ भारत अभियानात संबंधित भागातील सुधारणा व प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण व शहरी भागात स्वच्छ भारत अभियानात लोकसहभाग महत्वाचा आहे. केंद्र व राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केलेली आहे त्याचा अनिधिकृत साठा व विक्री करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई केली पाहिजे अशा सूचना दिल्या.

प्लास्टिक विरोधात मोहिम

विभागीय आयुक्त यांनी प्लास्टिक हा पर्यावरणास हाणीकारकच आहे असे सांगून “मी प्लास्टिक वापरणार नाही, वापरू देणार नाही” याची जनजागृतीही केली पाहिजे. कापडी पिशवी वापरावी. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. जेणेकरून कुटुंबातील व्यक्तीही प्लास्टिक वापरास आळा घालतील. प्रेरणा व कृतीत बदल होण्यास समाजातील सर्वच घटकांनी पर्यावरण जनजागृतीद्वारे प्लास्टिक विरोधात मोहिम उभारली पाहिजे असे सांगितले.

या बैठकीत माझी वसुंधरा अभियान 4.0, स्वच्छ भारत अभियान डीप क्लिनींग अभियान, पथ विक्रेता सर्वेक्षण व धोरण, मालमत्ता व पाणीपट्टी कर, प्रधानमंत्री आवास योजना आदीबाबत आढावा घेवून कृती व कार्यातून जनजागृती करण्याची सूचना देण्यात आल्या.

000000