माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घाटकोपर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप

मुंबई दि.3 : माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना, घाटकोपर,(पूर्व)हा पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल. एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन ही केवळ एक योजना नसून राज्य शासनाने झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,आमदार पराग शहा,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेद्र कल्याणकर ,माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,एसआरए व एमएमआरडीए यांच्या संयुक्त भागीदारीतून झोपडपट्टी पुनर्वसन एक आदर्श उपक्रम या निमित्ताने सुरु होत आहे. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागावेत त्यासाठी पुनर्विकासाच्या योजनेमध्ये शासकीय संस्थांचा सहभाग करण्यात आला आहे. पुनर्वसन योजना गतीमान करण्यासाठी एमएमआरडीए, म्हाडा, सिडको व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या संयुक्त भागीदारीने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आता एसआरए अन्य शासकीय संस्थांबरोबर संयुक्त भागीदारी तत्वावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवणार आहे. त्यामुळं नजीकच्या काळात सुमारे दोन लाख झोपडपट्टीवासियांना सदनिका उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये एसआरए व एमएमआरडीए यांचं योगदान आणि प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.

झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावणे, त्यांना स्वत:चे हक्काचे घर मिळावे यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.एसआरए या योजनेमध्ये नियोजन प्राधिकरण आहे. तर एमएमआरडीए विकासक म्हणून काम करत आहे. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या संकल्पासाठी हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावणार आहे.तो लवकरात पूर्ण करावा. मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बुलेट ट्रेन, मेट्रो, सिमेंटचे रस्ते या सारख्या महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांना गती दिली जात आहे.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये दीड कोटीहून अधिक बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.ज्येष्ठांना वयोश्री योजना आणली आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आमचे सरकार करीत आहे.असेही श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे 17 हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी एमएमआरडीए आणि एसआरए यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.पुनर्विकास काळात पर्यायी निवाऱ्याच्या भाड्यापोटी झोपडीधारकांना दरमहा पंधरा हजार तर दुकानदार,व्यावसायिकांना दरमहा 25 ते 30 हजार भाडे देण्यात येणार आहे. आज त्याचेच धनादेश वितरण करण्यात आले.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ