मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

मुंबई, दि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात ‘महिला संचालित मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत. महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ‘सखी मतदान केंद्र’ उभारण्यात येत आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघात मिळून एकूण ११ सखी मतदान केंद्रे असणार आहेत. ११ सखी मतदान केंद्रापैकी मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात ६ तर मुंबई दक्षिण मतदारसंघात ५ सखी मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असून धारावी मतदारसंघात दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत. भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथील मतदान केंद्र क्रमांक १०० आणि धारावी ट्रान्सलेट कॅम्प मनपा शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक ८२ ही धारावी मतदारसंघातील दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत.

सखी मतदान केंद्रांवर महिलांसाठी आवश्‍यक सुविधा देण्यात येणार आहेत. स्त्री – पुरुष समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र म्हणून याला ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव ठेण्यात आले आहे. सखी मतदार केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी या महिलाच असणार आहेत. या मतदान केंद्राला लग्न मंडपासारखे सजविण्यात येते. जागोजागी रांगोळी, स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/