मुंबई शहरात २० मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी मतदार कामगार, अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्या

मुंबई, दि. १९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच राज्याच्या सीमेलगतच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना जरी ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात दि. २० मे, २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत.

मतदानाच्या दिवशी कार्यरत कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने इत्यादींना बंधनकारक आहे. खाजगी कंपन्यांमधील आस्थापना सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी कामगार अधिकारी-कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी संस्थेतील अधिकारी- कर्मचारी मतदान करण्यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन मतदानासाठी दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे निर्देशही श्री. यादव यांनी दिले आहेत.

मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्याबाबतच्या निर्देशाचे, सूचनांचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांच्या मालकांनी व व्यवस्थापनाने योग्य ते पालन करण्याचे निर्देश श्री. यादव यांनी दिले आहेत.

मतदानाच्या दिवशी आस्थापना बंद न ठेवता मतदारांना मतदान करणे शक्य न झाल्याबाबत तक्रारी आल्यास संबंधित आस्थापनेवर कारवाई करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते. तसेच काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र, निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामध्ये काही मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहू नये, यासाठी हे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत.

आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, काही संस्था आस्थापना त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा

सवलत देत नाहीत, त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी घातक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी हे निर्देश निर्गमित केले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागानेही ०५ एप्रिल, २०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता लोकसभा मतदारसंघातील खाजगी कंपन्यांमधील आस्थापना सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत परिपत्रक काढले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/