मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २२ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘महासंस्कृती महोत्सवा’चे आयोजन

             मुंबई, दि. १६ : राज्य शासनातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २२ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुंबईतील शहीद भगतसिंग मैदान, अभ्युदय नगर येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून महोत्सवाचे नियोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी  दिल्या.

जिल्हास्तरावर आयोजित होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर, शिक्षण विभागाच्या प्रतिनिधी वैशाली शिंदे, पोलिस निरीक्षक संजय मोहिते, अशोक लांडगे (वाहतूक) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी म्हणाले की, या महोत्सवाच्या माध्यमातून विविध विभागातील संस्कृतीचे आदान- प्रदान, स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात- अज्ञात लढवय्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा पाच दिवसीय सांस्कृतिक महोत्सव होईल. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे.

महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रदर्शनांचा समावेश असेल. त्यात शस्त्र व हस्तलिखितांचे प्रदर्शन, बचतगटांचे स्टॉल मांडण्यात येतील. पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या सोहळ्याचे प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, अशाही सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी दिल्या.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं