मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांना श्रद्धांजली

मराठी भाषेच्या ऐश्वर्यात भर घालणारा श्रमसाधक लेखक

मुंबई, दि. २१ : श्रमसाधनेबरोबरच आपल्या साहित्यसेवेतून मराठी भाषेचं ऐश्वर्य वाढवणारा साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

निपाणी सारख्या परिसरात राहून त्यांनी आपल्या लेखनातून या परिसरातील मराठी भाषेची श्रीमंती जगभर पोहोचवली. सीमा भागातील मराठी भाषकांसाठी मोरे यांचे लेखन नेहमीच नंदादीपासारखं तेवत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, महादेव मोरे यांनी आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच निरलस, निखळपणे साहित्याची सेवा केली. त्यांनी आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सीमाभागातील मराठीचा लहेजा, शैली आणि मराठी संस्कृतीचं महत्वाचं चित्रणही त्यांच्या लेखनात येते. श्रमांचे मोल जाणणारा, श्रमसंस्कार झालेला, कष्टकरी, कामगार आणि ग्रामीण जीवनाचं नेमकं चित्रण करणारे लेखक म्हणून महादेव मोरे मराठी भाषा प्रेमींच्या सदैव स्मरणात राहतील. ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

०००