मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २२:- जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले लोकाभिमुख नेतृत्व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले नेतृत्व म्हणून खासदार चव्हाण यांची ओळख कायम राहील. नायगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच लोकसभा सदस्य असा त्यांचा राजकीय आलेख राहिला आहे. घरातून मिळालेला समाजकारण, राजकारणाचा वारसा चालवताना त्यांनी नेहमीच लोकाभिमुख भूमिका घेऊन सहकार तसेच विविध क्षेत्रांत काम केले. नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही कार्य केले. नायगाव विधानसभा क्षेत्र आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे ज्येष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियांवर आघात झाला आहे. ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ नेते, खासदार वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!