मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना निरंतर चालू राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

बुलढाणा, दि. 19 : राज्यातील महिलाभगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

 महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा महिलाभगिनींच्या मोठ्या उपस्थितीत बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ शाळेच्या मैदानावर झाला. त्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान व विविध विकासकामांचे लोकार्पण झाले, त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार किरण सरनाईक, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमूलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे आदी यावेळी उपस्थित होते.                                                                                                                                मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  महिलाभगिनींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना व्यापकपणे व गतीने राबविण्यात आली. विक्रमी कमी वेळेत पैसे खात्यात येण्याची ही योजना ठरली आहे. शासनाने ३३ हजार कोटी रुपये या योजनेसाठी बाजूला काढून ठेवले आहेत. त्यामुळे योजना कधीही बंद पडणार नाही. योजनेत मिळणाऱ्या रकमेमुळे गरीबांना निश्चित मदत होत आहे. यापुढेही बळ मिळाले तर आम्ही ही रक्कम वाढवत जाऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, मुलींना मोफत शिक्षण, लेक लाडकी, लखपती दीदी, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, किसान सन्मान योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा योजनांमुळे महिलांना व कुटुंबांना बळ मिळत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे जाळे निर्माण होत आहे. अधिकाधिक बहिणींना लखपती झाल्याचे बघायचे आहे. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

बुलढाणा शहरात निर्माण करण्यात आलेले महापुरूषांचे पुतळे व विविध कामे सौंदर्यीकरण व विकासाला चालना देणारी आहेत. महापुरूषांच्या स्मारकामुळे नव्या पिढीला कायम स्फूर्ती मिळत राहील, असेही त्यांनी सांगितले.

एक कोटी भगिनींना लखपती बनविणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आर्थिक विकासाच्या प्रवाहात महिलांना आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदीसारख्या अनेक योजना सुरू केल्या. राज्यातही 1 कोटी महिलाभगिनींना लखपती बनविण्याचा आमचा निर्धार आहे. राज्यात भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, एसटी प्रवास सवलत, मोफत शिक्षण अशा योजनांबरोबरच लाडक्या भावांसाठीही युवा कार्य प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, पीक विमा, सोलर वीज अशा विविध योजना सुरू केल्या आहेत. शासनाने जिगाव प्रकल्प पूर्णत्वास नेला असून, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

योजनेमुळे ग्रामीण अर्थचक्राला गती – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले, तसेच ग्रामीण अर्थचक्राला गती दिली आहे. या रकमेमुळे महिलाभगिनींना आत्मविश्वास मिळाला असून,  छोटे व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. राज्य शासनाने समाजातील सर्व घटकांसाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. राज्यात उद्योग- व्यवसायांचीही भरभराट होत असून, देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. बुलडाणा शहरात उभे राहिलेले महापुरूषांचे पुतळे नवीन पिढीला सातत्याने प्रेरणा देत राहतील, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप, तसेच लखपती दिदी योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा योजना लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. बुलढाणा जिल्हा प्रशासनातर्फे प्रकाशित जिल्हा कॉफीटेबल बुक आणि ‘राजमाता’ बोधचिन्हाचे अनावरण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

प्रारंभी मुख्यमंत्री श्री. शिंदे व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे, तसेच राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. आमदार संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

महिलाभगिनींचा प्रचंड उत्साह आणि दाद

समारंभात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लक्षावधी भगिनी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर महिलाभगिनींनी टाळ्यांच्या कडकडाटात व मोबाईल टॉर्च उंचावून त्यांचे जोरदार स्वागत केले. लाडक्या बहिणींचे अभिवादन स्वीकारत मान्यवरांनी मंचावर प्रवेश केला. यावेळी अनेक भगिनींनी मान्यवरांना राख्या बांधल्या व त्यांच्यासमवेत सेल्फीही घेतली. मान्यवरांनीही सर्वांचे अभिवादन स्वीकारत त्यांच्याशी संवाद साधला.