मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला मोठा आधार मिळाला – महिलाभगिनींनी व्यक्त केली भावना

बुलढाणा, दि.19 : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, घरखर्च, ज्येष्ठांचा औषधोपचार आदी बाबींबरोबरच महत्त्वाच्या व तातडीच्या गरजा भागविल्या जात आहेत. ही योजना आमच्यासाठी मोठा आधार असल्याची भावना मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत वचनपूर्ती सोहळ्यात आलेल्या बहिणींनी व्यक्त केली.

बुलढाणा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान व विविध विकासकामांचे लोकार्पण समारंभ शारदा विद्यालयाच्या मैदानावर झाला. याप्रसंगी जिल्हाभरातून लक्षावधी भगिनी उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावागावातून महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. समारंभात महिला भगिनींनी मोबाईल टॉर्च उंचावून व टाळ्यांच्या कडकडाटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले.

मान्यवरांनीही गुलाब पाकळ्या उधळून लाडक्या बहिणींचे स्वागत केले. अनेक भगिनींनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या रकमेतून संसाराला आधार मिळाला आहे. त्याचप्रमाणे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे महिलांचे सशक्तीकरण होत आहे, अशी भावना यावेळी भगिनींनी व्यक्त केली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास झळकत होता. आता आम्हीही कुणावर अवलंबून नाही, आमच्या लाडक्या भावाने आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिले, ही भावना व आनंद त्यांनी व्यक्त केला.

रक्षाबंधनाचा सण गोड झाला – राधा झालटे

‘रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधीची घटना. सण जवळ आला होता, पण हातात पैसे नव्हते. खूप चणचण होती. मुलांना कपडे, स्वत:साठी साडी, शैक्षणिक साहित्य घ्यायचे होते. राख्या खरेदी केलेल्या नव्हत्या आणि इतक्यात…माझ्या फोनवर बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आणि माझी चिंता मिटली….’ माझ्या बँक खात्यात 17 ऑगस्टला योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले. त्यातून माझ्या कुटुंबाचा रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा झाला, अशी प्रतिक्रीया बोरखडे (ता.जि.बुलढाणा) गावातील सौ. राधा शिवाजी झालटे यांनी दिली.

भेट भावाची, ठेव मुलांच्या भविष्याची – मीना कहाते

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानते. या योजनेचा अर्ज करताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. माझ्या खात्यात बरोबर तीन हजार रुपये जमा झाले. माझी दोन्ही मुले वसतीगृहात शिकतात. या योजनेतून मिळालेले पैसे भावाची भेट म्हणून मुलांचे शैक्षणिक साहित्य, गणवेश खरेदीसाठी उपयोगी पडले. योजनेतून मिळणाऱ्या पैश्यांचा उपयोग मी माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणार, अशी भावना बोरखडे (ता.जि. बुलढाणा) गावातील सौ. मीना जयराम कहाते व रेखा सुनील ननई या दोघी बहिणींनी व्यक्त केली.

संसाराला हातभार लाभला – सिंदखेड माखल्याच्या भगिनींची प्रतिक्रिया

मी व माझे पती दोघेही शेत मजुरीचे काम करतो. घरात नेहमी पैश्याची चणचण होती. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात माझ्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले. माझ्या कुटुंबासाठी हे पैसे अडचणीच्या काळात घरखर्चासाठी उपयोगी पडले. या पैश्यांमुळे माझ्या संसाराला हातभार लागला असून त्यातून मुलींसाठी शैक्षणिक साहित्य व कपड्यांची खरेदी केली. योजनेतून पैसे मिळाल्यानिमित्त मी मुख्यमंत्री महोदयांची आभारी आहे. ही योजना अशीच नियमितपणे सुरु राहावी, अशी प्रतिक्रिया बुलढाणा तालुक्यातील सिंदखेड माखल्याच्या भारती सचिन खंडारे व सिंधु उबरहांडे या दोन्ही भगिनींनी व्यक्त केली.

योजनेच्या पैश्यातून घडले शिर्डीदर्शन – अर्चना उबरहांडे

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची माहिती व अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी ताईंनी मला मदत केली. या योजनेमुळे आम्हा महिलांना घरातील तातडीची कामे करण्यासाठी आर्थिक हातभार मिळाला आहे. मुलांचे शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय उपचार तसेच घरखर्च भागविण्यासाठी या पैश्यामुळे खूप मोठा आधार मिळाला. खूप दिवसापासून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्याची इच्छा होती. मात्र, पैश्याची वानवा असल्यामुळे दर्शन राहून गेले होते. योजनेतून मिळालेल्या पैश्यांमुळे मी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊ शकले, अशी भावना सिंदखेड माखल्याच्या अर्चना उबरहांडे यांनी दिली.

मुख्यमंत्री नावाच्या भावाने दिली कल्याणकारी योजनांची शिदोरी – शीतल महाले

शासनाने केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ दिला नसून महिलांना अनेक कल्याणकारी योजनांची शिदोरी दिली. लेक लाडकी बहिण, माझी मुलगी भाग्यश्री योजना, मुलींना मोफत उच्चशिक्षण, एसटी प्रवासात सवलत या योजनांच्या मदतीने आम्हाला व आमच्या मुलींच्या शैक्षणिक व आर्थिक गरजा पूर्ण करता येणार आहेत. लाडकी बहीण योजनेतून मिळालेली रक्कम ही मुला-मुलींच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी व घरखर्चासाठी उपयोगी पडली. त्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानते, अशी भावना बुलढाणा तालुक्यातील मासरुळ येथील रहिवासी शितल विनोद महाले यांनी व्यक्त केली.