रायगड, जिमाका दि. 15 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याची ही ऐतिहासिक योजना राबविण्याची संधी मिळाली असून अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.
रोहा येथील जेष्ठ नागरिक सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रमाणपत्राचे पात्र महिला भगिनीना महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.या प्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख,महिला व बालविकास अधिकारी (जि. प.) निर्माला कुचीक, पोलिस निरीक्षक देवीदास मुपडे, गटविकास अधिकारी शुभदा पाटीलआदी उपस्थित होते.
मंत्री कु तटकरे यांनी सांगितले की ही योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. तसेच म हाराष्ट्रात सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी ही योजना राबविण्यासाठी अतिशय मेहनत घेतली.पात्र ३२ लाख लाभार्थ्यांना एका क्लिकवर पैसे वितरण केले आहे..आतापर्यंत ४८ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले असून पुढील लाभ देण्याचे काम सुरू आहे. ही योजना यापुढेही कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री कु. तटकरे यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक उप विभागीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुटवड यांनी अनेक योजनांची जननी रायगड जिल्हा असल्याचे सांगितले. रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्या पैकीच आहेत योजना सर्वत्र राबविले जात आहे. शासनाच्या सर्व विभागांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलबजावणी साठी चांगले काम केले आहे. असे सांगितले.
महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील तळा, किल्ला आणि रोहा क्षेत्रातील पात्र महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश भोईर यांनी केले .यावेळी मोठ्या संख्येने शासकीय अधिकारी, कर्मचारी व मोठ्या प्रमाणात महीला उपस्थित होते.