‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविताना पारदर्शकता ठेवा -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

प्राप्त लाख ५९  हजार ८२७  अर्जापैकी ४ लाख २४ हजार २११ अर्जांना मान्यता
प्राप्त सर्व अर्ज तात्काळ निकाली काढा

सांगली, दि. (जिमाका): महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा तळागाळातील लोकांपर्यंत मिळेल. ही योजना राबविताना पारदर्शकता ठेवावी. प्राप्त सर्व अर्ज निकाली काढावेत, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा आढावा पालकमंत्री डॉ. खाडे यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संदीप यादव, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की, या योजनेंतर्गत जिल्ह्यात दिनांक 9 ऑगस्ट रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 4 लाख 59 हजार 827 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 4 लाख 24 हजार 211 अर्जांना मान्यता दिली आहे, अंशता अमान्य अर्ज 33 हजार 313 असून 2 हजार 303 अर्ज अमान्य आहेत. अंशता अमान्य अशा अर्जातील त्रुटी प्रशासनाने संबंधिताना कळविल्या आहेत. संबंधितांनी त्या त्रुटींची पुर्तता तात्काळ करावी. या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत मंजूर होवून शासनास सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील प्राप्त अर्जांची कार्यवाही पुढे चालू राहणार असून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने  प्राप्त अर्जांना मंजुरी देण्यात आली.  बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संदीप यादव यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्राप्त व निकाली अर्जांची सविस्तर माहिती दिली.

०००