मुंबई, दि. 12 : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ व ‘अन्नपूर्णा योजना’ या सर्वसामान्य महिलांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. शासन राज्याच्या विकासाला प्राधान्य देत असतानाच कल्याणकारी योजनाही राबवित असून यातून विकास व कल्याण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
इंडिया टुडे ग्रुपच्या ‘मुंबई तक बैठक’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुंबई तकच्या अँकर हर्षदा परब, अनुजा धाक्रस आणि माधवी देसाई यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची आज मुलाखत घेतली.
SPK DGIPR Mantralay Mumbai
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे शासन आहे. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना, अन्नपूर्णा योजना याबरोबरच वयोश्री योजना, तीर्थक्षेत्र योजना अशा अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेची तयारी ही गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सुरू होती. घरातील महिलांना घरखर्च करताना कसरत करावी लागते. त्यांना आधार देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून राज्य शासन करत आहोत. ही योजना सध्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनेतून वर्षातून तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. ‘लेक लाडकी लखपती योजना’ तसेच मुलींना उच्च शिक्षणासाठी शिक्षण शुल्क माफी अशा योजनेतून महिलांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. या कल्याणकारी योजनांसाठी निधीची तरतूद करूनच त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
महाराष्ट्र हे राज्य प्रगतीशील राज्य असून राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू होत असून रोजगार संधी निर्माण होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. राज्य शासन करत असलेली सकारात्मक कामे, योजना ही माध्यमांनी आपल्या व्यासपीठावरून लोकांपर्यंत पोहोचवावीत. लोकांच्या हिताची कामे दाखवावेत. वस्तुनिष्ठ माहिती पोचवावी. लोकांच्या समस्यांना वाचा फोडणारी पत्रकारिता व्हावी अशी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ