‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेत दोन लाख महिला पात्र; जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री विजयकुमार गावित

भंडारा, दि. 15 : महिलांच्या आर्थिक विकासासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जिल्ह्यात कार्यरत असून यामधून एकूण दोन लाख 3 हजार 581 महिला पात्र ठरल्या आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज केले.

पोलीस कवायत मैदानावर आयोजित 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रशांत पडोळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्यासह जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आधारभूत दरानुसार 688 कोटी रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात दिली. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त युवक युवतींना सामावून घेण्यात येणार आहे. जलजीवन मिशन जिल्ह्यातील एकूण 83 टक्के कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पोलीस कवायत मैदानावर आज सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन परेड निरीक्षण झाले. पोलीस, गृह रक्षक दल, छात्रसेना व विद्यार्थी यांनी मानवंदना दिली. परेड संचलनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री श्री.गावित यांनी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वमीभूमीवर तिरंगा शपथ घेण्यात आली.

या मुख्य शासकीय कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नागरिक माध्यम प्रतिनिधी तसेच महिला बचत गटाच्या प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

 

स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार

पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री श्री.गावित यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या मुख्य कार्यक्रमानंतर करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जम्मु काश्मीर मोहिमेमध्ये अपंगत्व आलेल्या सेवारत सैनिक विरेंद्र भोजराज अंबुले यांना ताम्रपट धनादेश व शाल श्रीफळ देऊन श्री. गावित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण कार्यक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल वनपाल आर.टी.मेश्राम व वनरक्षक पि.आर आंबुले यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन या विभागातर्फे पुरुषोत्तम रुखमोडे सरपंच व नरेश शिवणकर, सचिव ग्रामपंचायत वलमाझरी, सौ. शारदा गायधने व विलास खोब्रागडे ग्रामपंचायत बेला प्रशांत भुते व कृष्णा दोनोडे ग्रामपंचायत मोखाडा यांना सन्मानित करण्यात आले.

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग पुरस्कार प्राप्त कृष्णा उद्योग व बजरंग राईस मिल खडकी यांना सन्मानित करण्यात आले. पोलीस अधीक्षक भंडारा यांच्यामार्फत सौरभ घरडे व मोहन निखारे, सुरेश उपाध्याय, दिनू मते आणि राजेश बांते यांना सन्मानित करण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत शालेय क्रीडा स्पर्धामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात आले. यामध्ये रॉयल पब्लिक स्कूल भंडारा, नूतन कन्या विद्यालय भंडारा, गांधी विद्यालय कोंढा, यांचा समावेश आहे.

00000