मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत १.७२ लाख रोजगारासाठी १ लाख युवक-युवतींची मागणी नोंद – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

जास्तीत जास्त उद्योजक, शासकीय आस्थापना आणि युवक-युवतींनी मागणी नोंदविण्याचे आवाहन

मुंबई, दि.८ : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत १.७२ लाख रोजगारासाठी १ लाख युवक-युवतींनी आपली मागणी नोंदवली आणि ७ हजार ३०० जणांना प्रत्यक्षात रोजगार प्राप्त झाला आहे. खाजगी तसेच शासकीय संस्थांनी मागणी नोंदवावी तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपण पुढे नेणार आहोत, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यातील विविध क्षेत्रांतील उद्योग, सेवा व औद्योगिक आस्थापनांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग सचिव गणेश पाटील, आयुक्त निधी चौधरी, राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचे अल्ताफ कलाम, संचालक सतीश सुर्यवंशी यासह राज्यातील कौशल्य विकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

SPK DGIPR Mantralay Mumbai

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन  दरमहा दिले  जाणार आहे. विविध संस्थांनी आपली मागणी नोंदवावी. या योजनेत जास्तीत बेरोजगार युवक-युवतींना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी  हे अत्यंत आवश्यक आहे. युवकांना चांगले प्रशिक्षण मिळाले तर त्यांना भविष्यात याचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातील विविध युवकांना एकत्र जोडून त्यांच्यासोबत सामंजस्य करार करून युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सचिव गणेश पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील युवकांना आणि उद्योगांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. सर्वसमावेशक अशी ही योजना महाराष्ट्र शासनाने बेरोजगार युवकांसाठी आणली आहे.

कौशल्य विकास नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती दिली. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपण यशस्वीपणे राबवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विविध उद्योजकांनी योजनेच्या अनुषंगाने मांडलेल्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.

००००

संध्या गरवारे/विसंअ